School Bus Hits Biker: दैनंदिन आयुष्यात आपण ज्या रस्त्याने घराबाहेर पडतो, शाळा, ऑफिस, बाजार यासाठी जातो, तोच रस्ता कधी जीवघेणा ठरतो हे तेलंगणातील मियापूर भागात घडलेल्या एका भीषण अपघाताने पुन्हा सिद्ध केलं आहे. सोशल मीडियावर एक हादरवून टाकणारा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत असून तो पाहून कोणीही हादरून जाईल.
दिवसभर गजबजलेल्या रस्त्यावर अचानक एक थरकाप उडवणारा क्षण घडतो… एका क्षणात आयुष्य संपतं आणि साक्षीदार ठरतो एक डॅशकॅम. तेलंगणातील मियापूरमध्ये चौराह्यावर जे घडलं, ते पाहून कोणाचंही काळीज थरथर कापेल. नेमकं काय घडलं? कोण जबाबदार? आणि बस चालवणाऱ्या ड्रायव्हरचा काय दोष? या सगळ्याचा थरकापजनक खुलासा व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलाय…
या व्हिडीओमध्ये एक दुचाकीस्वार व्यक्ती चौरस्त्यावरून शांतपणे रस्ता पार करत असल्याचं दिसतं. पण, अवघ्या काही सेकंदात एका वेगात धावणाऱ्या शाळेच्या बसने भररस्त्यात त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळताच त्याचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना एका कारच्या डॅशकॅममध्ये संपूर्णपणे कैद झाली होती.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, बस अत्यंत वेगात होती आणि पूर्णपणे नियंत्रणाबाहेर होती. दुसरीकडे, दुचाकीस्वार रस्ता पार करताना पुरेसे सावध दिसत होता. मात्र, बसचालकाने ब्रेक दाबण्याचा किंवा वेग कमी करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. काही क्षणांतच सगळं शांत झालं… मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला तिथेच सोडून बस निघून गेली.
पोलिसांची कठोर प्रतिक्रिया
घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यावर प्रतिक्रिया देताना तेलंगणा पोलिसांनी अधिकृतपणे व्हिडीओ पोस्ट केला आणि एक महत्त्वाची विनंती केली. “शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांनी संयमाने वाहन चालवावे. शाळांनी जबाबदार आणि प्रशिक्षित चालकांची नियुक्ती करावी आणि पालकांनीही यावर लक्ष ठेवावं,” असं पोलिसांनी म्हटलं आहे. ही घटना मियापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
नेटिझन्स संतप्त
या भयावह व्हिडीओवर लोकांचा संताप व्यक्त होत आहे. “ड्रायव्हरने नक्कीच मद्यप्राशन केलं असेल”, “टक्करनं एक कुटुंब उद्ध्वस्त केलं”, “जर सिग्नल असता तर माणूस वाचला असता”, अशा विविध प्रतिक्रिया नेटिझन्सकडून व्यक्त केल्या जात आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
ही घटना फक्त एक अपघात नसून, ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गोंधळ, बेदरकारपणा आणि दुर्लक्ष यांचं भयावह चित्र समोर आणते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही रस्त्यावर जाताना दहावेळा विचार कराल…