Viral video: भटक्या कुत्र्यांचा त्रास हा काही नवीन नाही. अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. गेल्या काही महिन्यांपासून देशात कुत्र्यांची दहशत वाढतच चालली आहे. सातत्याने कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्या कोणत्या ना कोणत्या शहरातून येत असतात. भटक्या कुत्र्यांचे हल्ले अनेकदा जीवघेणेही ठरले आहेत. दरम्यान आता पाळीव कुत्रेही कधी आक्रमक होतील ते सांगता येत नाही. अशाच एका कुत्र्यानं महिलेवर अचानक हल्ला केला अन् स्वत:ला वाचवण्यासाठी महिलेनं २० फूटावरून थेट खाली उडी मारली. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ग्रेटर नोएडा वेस्टच्या इको व्हिलेज-१ सोसायटीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सोमवारी एक महिला सोसायटीच्या आवारात मॉर्निंग वॉकसाठी निघाली होती, तेव्हा अचानक एका पाळीव कुत्र्याने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात, ३७ वर्षीय महिला वीस फूट उंचीच्या व्यासपीठावरून खाली पडली आणि गंभीर जखमी झाली.

जखमी महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि तिला ताबडतोब ऑपरेशन थिएटर (ओटी) मध्ये हलवण्यात आले आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की कुत्र्याने अचानक महिलेवर झडप घातली, ज्यामुळे ती तिचा तोल गेला आणि खाली पडली. दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असेही दिसून येते की ती पडताच एक माणूस तिच्या मदतीसाठी धावतो. मात्र कुत्र्याची मालकीण मदतीसाठी जायचं सोडून जणू काही झालंच नाही असं दाखवत तिथून कुत्र्याला घेऊन निघून जाताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

यामध्ये महिला बाचवली असून महिलेच्या मणक्याला दुखापत झाली आहे. तिच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. पीडितेच्या पतीने सांगितले की, नऊ वाजता ती नेहमीप्रमाणे सोसायटीतील आवारात मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. एक महिला तिच्या पाळीव कुत्र्यालाही फिरवत होती. त्यावेळी कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. महिलेला चार महिन्यांची मुलगी देखील आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @GreaterNoidaW नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत.