पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी जनतेशी ‘मन की बात’मधून संवाद साधतात. आता मोदींच्या ‘मन की बात’ने १०० चा टप्पा गाठला आहे. या निमित्ताने भाजपा नेत्यांनी देशभरात ‘मन की बात’ कार्यक्रम कार्यकर्ते आणि नागरिकांना ऐकता यावा यासाठी आयोजन केले. असाच एक कार्यक्रम केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी कणकवलीत घेतला. मात्र, या कार्यक्रमात राणेंना डुलकी लागल्याचा प्रकार समोर आला. यानंतर ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींना टॅग करत राणेंवर सडकून टीका केली.

ठाकरे गटाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे म्हणाल्या, “बघा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुमच्या ‘मन की बात’मध्ये तुम्ही खासदारकी आणि मंत्री पद दिलेले नारायण राणे कशी झोप काढत आहेत.”

या ट्वीटखाली अनेकांनी प्रतिक्रिया देत नारायण राणेंना ट्रोल केलं आहे. कुणी म्हटलं माननीय लोक झोपा काढत आहेत, कुणी म्हटलं यांना काहीच कळत नसेल, तर कुणी म्हटलं यात राणेंचा दोष नाही, मन की बात हा कार्यक्रमच फार बोअर असतो.

“मन की बातदरम्यान अनेकदा भावूक झालो”

दरम्यान, १०० व्या मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचे आभार मानले. पंतप्रधान म्हणाले, तुम्ही पाठवलेली पत्रं वाचून मी भावूक झालो. माझ्यासाठी हा कार्यक्रम आता एक पर्व बनलं आहे. या कार्यक्रमाने मला तुमच्यासोबत जोडून ठेवलं आहे. या कार्यक्रमामुळे मी तुमचे विचार समजू शकलो. मन की बात आता माझ्यासाठी कार्यक्रम नसून पूजा आहे.”

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगदरम्यान मी खूप वेळा इतका भावूक झालो की त्या कार्यक्रमाचं पुन्हा रेकॉर्डिंग करावं लागलं. हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा आहे. ही मोहीम भारतासह परदेशातही खूप नावाजली गेली. हा सेल्फीचा मुद्दा नव्हता तर मुलींशी संबंधित होता. यात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले. मन की बात हा कार्यक्रम म्हणजे कोट्यवधी भारतीयांच्या मनातली गोष्ट आहे. त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण आहे.”

हेही वाचा : विश्लेषण : ‘मन की बात’चे शतक : जगभरातील नेत्यांच्या जनसंवादाच्या कुळकथा काय आहेत?

“आपण ३ ऑक्टोबर २०१४ रोजी हा ‘मन की बात’चा प्रवास सुरू केला. देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्व वयोगटातील लोक ‘मन की बात’मध्ये सहभागी झाले. ‘मन की बात’शी संबंधित विषय जनआंदोलन बनले. मी एकदा अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी ‘मन की बात’बद्दल काही गोष्टी शेअर केल्या, तेव्हा या कार्यक्रमाची जगभरात त्याची चर्चा झाली,” असंही मोदींनी नमूद केलं.