There Are 1,000 Reasons Not To Return To India, Video Of NRI Goes Viral: अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीयाने बनवलेला एक हलकाफुलका पण विचार करायला लावणारा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘फॅक्ट्युअल अनिल इन अॅक्च्युअल यूएस’ या नावाच्या इन्स्टाग्राम युजरने पोस्ट केलेल्या या व्हिडिओत परदेशात दररोज कराव्या लागणाऱ्या घरगुती कामांमधील आणि भारतातील मोठ्या संघर्षांमधील फरक अधोरेखित केला आहे.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “पीओव्ही: झाडू-पोछा, भांडी-कपडे सर्व धुऊन झाले आहे, तरीही परत यायची इच्छा नाही. परदेशात घरकाम करताना तक्रारीसाठी शंभर कारणे असतात, पण भारतातील गोंधळापासून दूर राहण्यासाठी १ हजार कारणे आहेत.”
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर अनिवासी भारतीयांसह (NRI) भारतात राहणारे युजर्सही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.
या व्हिडिओमध्ये अमेरिकेतील भारतीय व्यक्ती झाडू-पोछा, भांडी-कपडे यांसारखी घरकामे करताना विनोदी पद्धतीने दाखवले आहे. मात्र, भारतात परतणे खरेच किती कठीण असू शकते, यासारख्या गंभीर मुद्द्यांवरही भाष्य केलेले दाखवले आहे.
“प्रदूषण, खराब पायाभूत सुविधा, कामाचा ताण, प्रचंड कर्ज, बेरोजगारी, कमी उत्पन्न, जास्त खर्च आणि जीवनमान” ही भारतातील जीवनाला तणावपूर्ण बनवणारी कारणे आहेत, अशी एक यादी पडद्यावर झळकते. व्हिडिओ “किप काम अँड डू युअर काम” या विनोदी ओळीने संपतो.
सोशल मीडियावर या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. एक युजर म्हणाला, “मी पूर्णपणे सहमत आहे. जे असहमत आहेत, त्यांनी किमान १ वर्ष बाहेर राहण्याचा प्रयत्न करावा. मग तुम्हाला कळेल की आपल्या सरकारने भ्रष्टाचार आणि कमकुवत पायाभूत सुविधांद्वारे आपल्याला कसे फसवले आहे.”
दुसऱ्याने पुढे म्हटले, “कोणीतरी वास्तव काय आहे, यावर भाष्य करत आहे याचा आनंद आहे.”
काहींनी घरापासून दूर राहण्याच्या भावनिक मुद्द्यावर प्रकाश टाकला. एका युजरने लिहिले, “परदेशी जीवनाचे फायदे आहेत, परंतु त्याचे काही तोटेही आहेत. त्यामध्ये परदेशी राहणे म्हणजे एकाकीपणा, आपल्या आवडत्या लोकांपासून दूर राहणे, आयुष्यातील सुख-दुःख कोणालाही सांगता न येणे आणि घरापासून दूर वाटणाऱ्या ठिकाणी आपलेपणाची भावना शोधणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.”