आतापर्यंत आपण विविध खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याचे जाणून होतो. रंग, चव, वास व वजन वाढविण्यासाठी ही भेसळ केली जाते. पण, आता अन्नपदार्थांतच नाही तर तुम्ही ज्या पेट्रोलवर वाहन चालवता, त्या इंधनामध्येही भेसळ केली जात आहे. पेट्रोलचे प्रमाण अधिक दिसावे यासाठी पेट्रोल पंपचालक पेट्रोल टँकमध्ये पेट्रोलसह पाणी भरत असल्याचे समोर आले आहे. पेट्रोलमधील या भेसळीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जयपूरमधील अजमेरी गेटजवळील पेट्रोल पंपावरील हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याला बाटलीत पेट्रोल भरण्यास सांगत असल्याचे दिसत आहे. यावेळी तो कर्मचारी व्हिडीओ बनवू देण्यास नकार देतो आणि म्हणतो की मी थोडं पाणी त्यात टाकलं आहे. त्यानंतर लोक त्याला सांगतात की, आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही. त्यानंतर बाटलीत पेट्रोल भरण्यास सुरुवात करताच लोक ते पाणी असल्याचे ओळखतात आणि पेट्रोलमध्ये बघा कसे पाणी मिसळतात, असे ओरडून सांगू लागतात. त्यानंतर राहुल नावाची एक व्यक्ती व्हिडीओमध्ये म्हणते, “मी ३२५ रुपयांचं पेट्रोल भरलं; पण त्यात मला पूर्णपणे पाणी मिळालं. मी कार सर्व्हिस करून घेतली, तेव्हा सर्व्हिसिंगवाल्या व्यक्तीनं सांगितलं की, तुमच्या कारच्या पेट्रोलच्या टाकीत पाणी भरलं आहे.”

हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो आतापर्यंत हजार लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले- ही एक गंभीर समस्या आहे. हे देशात जवळपास सर्वत्र घडत आहे. दुसऱ्या युजरने लिहिले- असे रोज घडते. सरकारने यावर कारवाई करावी. तिसऱ्या युजरने लिहिले- हा घोटाळा प्रत्येक राज्यात आहे. आणखी एका युजरने लिहिले की, त्यांचा परवाना रद्द केला पाहिजे.