काही जणांचं प्राणीप्रेम इतकं असतं की काही झाले तरी ते आपल्यापासून त्यांना दूर लोटत नाहीत. आता या नववधूचं घ्या ना, आपल्या पाळीव कुत्र्यावर तिचं एवढं प्रेम आहे की मेहंदीवर ‘दुल्हा दुल्हन’ रेखाटण्याऐवजी तिनं पाळीव कुत्र्याचं चित्र रेखाटून घेतलंय. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना? पण तुम्ही जे वाचलं ते शंभर टक्के खरंय.

जास्मिन संधू नावाच्या नववधूनं लग्नासाठी हातभर मेहंदी काढून घेतली. आता नववधूची मेंहदी म्हटली की त्यात दोन्ही हातांवर ‘दुल्हा- दुल्हन’ रेखाटण्याची पद्धत आहे. पण तिनं मात्र मेहंदी काढणाऱ्या व्यक्तीकडून दोन्ही हातावर आपल्या लाडक्या कुत्र्याचं चित्र रेखाटून घेतलं. तिच्या या हटके मेहंदी डिझाइनमुळे तिनं सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. आता हातावर दुल्हा दुल्हन किंवा नवऱ्याचं नाव रेखाटून घेण्याऐवजी तिनं कुत्रा का रेखाटला हा प्रश्न साहजिकच तिला विचारला गेला. तेव्हा, केवळ प्रेमापोटी असं केल्याचं तिनं म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी जास्मिनच्या आईला रस्त्यावर कुत्र्याचं पिल्लू भेटलं होतं, तिच्या आईने ते उचलून घरी आणलं. आता ते घरातल्या एका सदस्याप्रमाणे झालंय. आपली आई तर या कुत्र्यावर मुलाप्रमाणे प्रेम करते असंही तिनं सांगितलं. तेव्हा कुत्र्यावरच्या प्रेमापोटी तिनं मेहंदीवर हट्टाने नवऱ्याच्या नावाऐवजी त्याचे चित्र रेखाटून घेतलं.