करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. ३१ मेपर्यंत चौथा लॉकडाउन सुरु राहणार आहे. चौथ्या लॉकडाउनमध्ये अनेक दुकांना आणि उद्योग व्यवसायांना काही अटींवर सूट देण्यात आली आहे. असं असलं तरी अनेक ठिकाणी केशकर्तनाचा व्यवसाय सुरु करण्यावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळेच अनेकांनी घरी केस कापण्याचा निर्णय घेतला आहे. २५ मार्चपासून केशकर्तनालये बंद असल्याने अनेकांनी घरीच वेगवेगळ्या कल्पना लावत केस कापण्याचा घाट घातल्याचे दिसत आहे. अनेक लहान मुलांचे केस त्यांच्या आईने किंवा ताईनेच कापले आहेत तर काही पुरुषांनी घरच्यांच्या मदतीने केसांना कात्री लावली आहे. अनेक सेलिब्रिटीजनेही घरातच केस कापतानाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. असं असलं तरी काहींनी अजूनही यासंदर्भात हिंमत दाखवलेली नाही. घरचे लोकं आपल्या केसांवर प्रयोग करतील किंवा इतर कोणत्याही कारणाने केस न कापलेल्या लोकांसाठी एका मध्यवर्गीय व्यक्तीने एक भन्नाट कल्पना सुचवली आहे. या व्यक्तीने स्वत:च स्वत:चे केस कसे कापू शकतो हे दाखवणारा एक २ मिनिटं १२ सेकंदांचा व्हिडिओच शेअर केला असून तो आता व्हायरल झाला आहे.

काय आहे हा जुगाड?

या व्हिडिओमधील व्यक्ती आधी केस कपड्यांवर पडू नये म्हणून वृत्तपत्र मध्यभागी गोलाकार कापून त्याचं केशकर्तनालयात असतं तशापद्धतीचं कव्हर कसं बनवता येईल हे दाखवतात. त्यानंतर ज्याप्रमाणे आपण केस विंचरतो त्याच पद्धतीने केस कापण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असल्याचे हे गृहस्थ सांगताना दिसतात. एक कंगवा, एक ब्लेड आणि एक पीनच्या मदतीने आरशासमोर बसून व्यक्ती स्वत:चे केस कापू शकते असं हे गृहस्थ सांगतात. केस जितके कापाचे आहेत त्या उंचीवर कंगव्यावर ब्लेड पीनने पॅक करावे. त्यानंतर ज्याप्रमाणे भांग पाडतो त्यापद्धतीने कंगवा फिरवावा आणि केस कापावेत असं हे गृहस्थ डेमोसहीत सांगताना दिसतात. अर्थात अशापद्धतीने केस कापताना कानाजवळ किंवा त्वचा कापली जाणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचेही ही व्यक्ती व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ…

या व्यक्तीने लढवलेली शक्कल अनेकांना आवडली असून अनेकांनी कमेंटमधून या व्यक्तीचे कौतुक केलं आहे. काहींनी आपण हे घरी ट्राय करुन बघतीलं आणि खरोखरच ही छान कल्पना असल्याचं म्हटलं आहे. मात्र असं असलं तरी अशापद्धतीने केस कापण्याचा विचार करत असल्याचे सावध राहणे फायद्याचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.