सणासुदीच्या काळात गोडाधोडाचे पदार्थ हवेच. त्यात गणपतीच्या काळात मोदक तर सर्वांच्या घरी आवर्जून बनवले जातात. काही ठिकाणी गव्हाचे मोदक तळून किंवा उकडून बनवले जातात. तर काही ठिकाणी तांदळाचे उकडीचे मोदक बनवले जातात. पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या या मोदकाच्या पाककृतींमध्ये बरेच बदल झाले आहेत. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मोदक आता बाजारात उपलब्ध असतात. यामध्ये घरी ट्राय करण्यासारख्याही काही वेगळ्या रेसिपीज आहेत. तुम्ही तांदळाचे उकडीचे मोदक छान करत असालच, तर त्यात हे मॉडिफिकेशन एकदा नक्की ट्राय करून बघा. काही नैसर्गिक पदार्थ वापरून या मोदकांना वेगळ्या फ्लेवर्सने आणि रंगात तयार करता येऊ शकते.
गोकर्ण फ्लेवरचे मोदक
गोकर्णाची फुलं तर तुम्हाला माहीत असतीलच. ती औषधीही असतात. गोकर्णाच्या फुलांचा सुंदर निळा रंग मोदक तयार करताना कसा वापरता येऊ शकतो ते जाणून घेऊ.
साहित्य: आठ ते दहा गोकर्णाची फुलं
२ वाटी तांदळाचं पीठ
दीड वाटी पाणी
अर्धा वाटी दूध
चमचाभर तूप
चवीपुरतं मीठ
कृती: पारंपरिक पद्धतीने ज्याप्रमाणे आपण उकड काढतो त्याचप्रकारे पाणी, दूध, तूप आणि मीठ टाकावे. त्यात गोकर्णाची फुलं टाकावीत. ५ मिनिटे हे मिश्रण उकळल्यावर त्याला निळाशार रंग येतो. त्यानंतर ही फुलं चमचा किंवा लहान चिमट्याच्या साहाय्याने काढून घ्यावीत. मग त्यात तांदळाचं पीठ टाकून नेहमीप्रमाणे उकड काढावी. पुढे ते गरम असताना मळून घ्यावे आणि सारण भरून त्याचे मोदक वळावेत.
केसर मोदक
साहित्य: २० ते २५ केशराच्या काड्या
२ वाटी तांदळाचं पीठ
दीड वाटी पाणी
अर्धा वाटी दूध
चमचाभर तूप
चवीपुरतं मीठ
कृती: पारंपरिक पद्धतीने उकड काढण्याच्या पद्धतीमध्ये फक्त केशराच्या काड्या टाकाव्यात. त्यामुळे उकडीला छान केशरी रंग येतो. त्यानंतर नेहमीप्रमाणे ती मळून घ्यावी आणि सारण भरून मोदक वळावेत.
रोझ मोदक
साहित्य: दीड कप पाणी
दीड कप दूध
चवीपुरतं मीठ
दोन चमचे तूप
रोझ सिरप २ ते ३ चमचे
गुलकंद २ चमचे
पीठीसाखर
कृती: उकड काढताना दूध, पाणी, मीठ, तूप एकत्र करून हे मिश्रण उकळावे. त्यात एक चमचा पीठीसाखर टाकावी आणि रोझ सिरप टाकावे. हे मिश्रण उकळल्यानंतर त्यात तांदळाचं पीठ टाकून ती उकड काढावी. छान गुलांबी रंगाचं असं हे मिश्रण तयार होईल. त्यानंतर नारळ, गुळाच्या सारणात गुलकंद मिक्स करून घ्यावे आणि ते सारण मोदक वळताना वापरावे.