सोशल मीडियावर एकदा एखादे गाणे, कुठल्या रीलमध्ये किंवा फोटोवर वगैरे कुणी वापरले की अचानक आपल्याला सगळीकडे त्याच संदर्भातल्या गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजे कुणी चित्र काढत असेल किंवा खाद्यपदार्थ बनवत असेल, तरीही दोघांच्या मागे तेच गाणे लावलेले आपल्याला ऐकू येते. काही जण त्यावर सुंदर नृत्य करून दाखवतात, तर कुणी अजून कुठली कला त्यावर सादर करत असतात.

मागच्या वर्षी अशा ट्रेंडिंग किंवा व्हायरल गाण्यांमध्ये ‘डझनम’ हे सर्बियन गाणे खूपच प्रसिद्ध झाले होते. या गाण्यावरूनच ‘मोये मोये’ मिम्स, विनोदी व्हिडीओ इत्यादी तुफान चर्चेचा विषय बनले होते. तसेच सध्या आपले एक मराठमोळे ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का’ नावाचे गाणे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओमागे वापरले जात आहे. अशातच रिया बोरसे नावाच्या लहान मुलीने तेच गाणे अत्यंत भन्नाट असे हावभाव देऊन गायल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Viral Video : प्रभू श्रीरामाच्या भजनावर ‘Spiderman’ वाजवतोय तबला! व्हायरल व्हिडीओ पाहून व्हाल मंत्रमुग्ध!

या व्हिडीओमधील चिमुकलीने केसांचा मस्त अंबाडा बांधून, हिरव्या रंगाची अगदी पारंपरिक पद्धतीची खणाची साडी आणि त्याला साजेसा असा रंगीत ब्लाउज घातलेला आहे. गळ्याशी बसणारे सोनेरी रंगाचे गळ्यातले, हातात बांगड्या आणि कपाळावर नाजुकशी चंद्रकोर टिकली लावून अगदी मराठमोळ्या नटीसारखा पेहेराव केलेला आहे. “गं तुझं टपोरं डोलं, जसं कोळ्याचं जाळं” म्हणत भुवया उडवून आणि हातवारे करत तिने गाण्याची सुरुवात केली आहे. संपूर्ण गाणे तिने असेच नखरेल हावभाव देत, कधी मानेला झटका देऊन तर कधी डोळे मिचकावून अतिशय खट्याळ आणि गोंडस पद्धतीने गायलेले आहे.

इन्स्टाग्राम @lil.singer.riya या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. रिया केवळ साडेतीन वर्षांची असून तिला ३०० हून अधिक गाणी गाता येतात. अशी माहिती @lil.singer.riya या अकाउंटवरून समजते. रियाने गायलेल्या या गाण्याला सोशल मीडियावरील सर्व नेटकरींनीदेखील प्रचंड पसंती दिली असून, या चिमुकलीचे भरभरून कौतुक केले आहे. काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया पाहा.

“रियाची आई, तुमच्याकडे एक विनंती आहे. कृपया, या मुलीची दृष्ट काढा, खूपच गोड आहे. बाळा, देव तुझं खूप भलं करो”, असे एकाने लिहिले आहे. “मी तुझ्या संगतीने येईल रिया. कित्ती ते गोड गं. खूपच मस्त” असे दुसऱ्याने लिहिले आहे. तिसऱ्याने, ‘एक्स्प्रेशन क्वीन’ असे म्हटले आहे. चौथ्याने, ‘कितीही वेळा हे रील पाहिलं तरी मन भरत नाहीये, खूप सुंदर’ असे म्हटले आहे. तर शेवटी पाचव्याने ‘भारी हावभाव दिले आहेत. एखाद्या रोमँटिक गाण्यावर मी इतके सुंदर हावभाव कधीच पहिले नव्हते. सगळ्यात मस्त वाटतंय ते म्हणजे, तोरा आणि तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार न्हाय’ यावर केलेले नखरे, खूप मस्त” असे भरपूर कौतुक केलेलं आपल्याला पाहायला मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : ‘मोये मोये’ गाण्याचा ट्रेंड तर माहित आहे; पण त्याचा नेमका अर्थ काय ते पाहा…

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला आत्तापर्यंत २.९ मिलियन इतक्या व्ह्यूज आणि १९८K लाईक्स मिळाले आहेत.