Mother Tigress Viral Video: जंगलाच्या शांततेत अचानक दिसतं एक अदभुत दृश्य… पाण्यानं भरलेल्या छोट्या खड्ड्यात मस्त डुंबताहेत वाघाचे गोंडस बछडे. ते खेळण्यात इतके रमलेत की, अवतीभवतीच्या जगालाच विसरूनच गेलेत. पण थांबा. त्यामागे लपलीये एक हृदयस्पर्शी गोष्ट… ते बिनधास्त आनंदात मजा लुटताहेत. कारण- त्यांच्या पाठीमागे बारीक नजर ठेवून, सावधपणे पहारा देतेय त्यांची आई वाघीण. तिच्या नजरेत आहे आपल्या शावकांसाठीची माया, काळजी आणि रक्षणाकरिता एकवटलेली ताकद. हा व्हिडीओ पाहताना तुम्हालाही जाणवेल की, खऱ्या आईची झोपही जागरूक असते. ती कधीच बेसावध राहत नाही… मग ती माणूस असो वा जंगलाची राणी.

सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत असलेला एक भन्नाट Video प्राणीप्रेमींना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकतोय. त्यात दिसतंय की वाघाचे छोटे छोटे बछडे उन्हाच्या तडाख्यातून सुटका मिळवण्यासाठी पाण्याने भरलेल्या छोट्याशा खड्ड्यात मजेत आंघोळ करताहेत; तर त्यांची आई त्यांच्या सुरक्षेसाठी जागरूकतेने पहारा देतेय.

हा २५ सेकंदांचा Video भारतीय वन सेवा (IFS) चे निवृत्त अधिकारी सुशांत नंदा यांनी एक्स (म्हणजेच पूर्वीचे ट्विटर)वर शेअर केला आहे. त्यांनी याला कॅप्शन दिलीय – ‘आईच्या डोळ्यांना झोप नसते.’ म्हणजेच वाघीण तिची लेकरं पाण्यात खेळत असली तरी ती नेहमी सावध असते. कुठल्याही संकटाची चाहूल लागताच त्यांच्या रक्षणासाठी तत्पर असते.

Video मध्ये दिसतंय की, उन्हाळ्याच्या प्रखर उष्णतेत वाघाचे बछडे पाण्यात एकमेकांवर उड्या मारत, धसमुसळेपणाने एकमेकांशी खेळत आहेत. पण, या सगळ्या प्रसंगामध्ये वाघीण आहे त्या जागेवरून एक इंचही हलत नाही वा त्यांच्यावरून आपली नजर न हटवता, एकटक आपल्या गोंडस बछड्यांवर लक्ष ठेवून असते. तिच्या त्या सावध नजरेत आईच्या मायेबरोबरच एका खंबीर रक्षकाची वृत्तीही स्पष्टपणे दिसून येते.

सुशांत नंदा यांनी सांगितलं की, मोठ्या मार्जार प्रजातींपैकी फार कमी प्रजातींना पाणी आवडतं; पण वाघाची प्रजाती मात्र वेगळी आहे. पाण्यात खेळणं त्यांना शरीराचं तापमान नियंत्रित ठेवायला मदत करतं. त्यामुळे त्यांची कीटक-परजीवींपासून सुटका होते आणि शरीराची ऊर्जासुद्धा वाचते.

प्राणीप्रेमींनी हा Video पाहताच अक्षरशः कौतुकाचा वर्षाव केला आहे. कुणी याला “अदभुत दृश्य” म्हटलं, तर कुणी “सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपला”, असं म्हणत त्याची स्तुती केली. लहान बछड्यांचा पाण्यातील आनंद आणि त्याचवेळी आई वाघिणीची रक्षकाची भूमिका – या दुर्मीळ क्षणांनी नेटिझन्सची मनं जिंकली आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

याआधीही सुशांत नंदा यांनी एक मन हेलावणारा Video शेअर केला होता, ज्यात एक हत्तीण आणि तिचं बाळ दिसत होतं. त्या Video मध्ये छोटा हत्ती आईच्या मार्गदर्शनाखाली उथळ पाण्यात उतरणं शिकतो आणि नंतर मजेत खेळू लागतो; तर त्याची आई त्याच्याकडे प्रेमळ, पण सजग नजरेने त्याच्याकडे बघत शांतपणे उभी असते.

जंगलातील हे क्षण आपल्याला आठवण करून देतात – आई म्हणजे आईच… मग ती मानव असो वा वाघीण!