Train Shocking Accident Video : लोक वेळ वाचवण्याच्या नादात घाईत असे काही निर्णय घेतात, जे अनेकदा जीवावर बेततात. विशेषत: वाहन चालवताना चालकाला खूप सावधपणे आणि विचारपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कारण- चालकाची एक चूक इतरांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे तुम्ही रस्त्यावरही अनेकदा पाहिलं असेल की, ठिकठिकाणी अति घाई संकटात नेई, अति घाई जीव जाई, अशा आशयाचे बोर्ड लावलेले पाहायला मिळतात. तरीही काही चालक घाईत नको त्या गोष्टी करून बसतात. सध्या सोशल मीडियावर एका भयंकर अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात चालकाच्या चुकीमुळे एक व्हॅन ट्रेनला इतक्या काही जोरदार धडकते की, तिचे अक्षरश: तुकडे तुकडे होतात. हा अपघात इतका भयंकर आहे की, तो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

यात एक व्हॅनचालक घाईघाईत रेल्वे क्रॉसिंग पार करण्याचा प्रयत्न करीत होता; पण तितक्यात बॅरियर खाली आणि व्हॅन ट्रॅकवरच अडकली. यावेळी प्रयत्न करुनही चालकाला व्हॅन रेल्वे ट्रॅकवर बाजूला करण्यास जागा मिळाली नाही. त्याच वेळी एक भरधाव ट्रेन आली अन् व्हॅनला थेट धडक देत सुसाट निघून गेली. या अपघातात व्हॅनचे अक्षरश: तुकडे तुकडे झालेत. ही घटना पोलंडमधील असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक पांढऱ्या रंगाची व्हॅन घाईघाईत रेल्वे क्रॉसिंग पार करण्याचा प्रयत्न करत होती. समोर क्रॉसिंग बॅरियर खाली येत असल्याचे दिसतानाही चालकाने व्हॅन क्रॉसिंगवरील रेल्वे ट्रॅकवर नेली. पण त्याने पहिले बॅरियर क्रॉस केले; पण पुढचे बॅरियर क्रॉस करण्याआधी ते खाली आले ज्यामुळे व्हॅन रेल्वे ट्रॅकवर फसली. यावेळी चालकाने व्हॅन कुठून बाहेर काढत येते का यासाठी प्रयत्न केला; पण त्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. याचदरम्यान समोर एक भरधाव ट्रेन आली अन् व्हॅनला धडक देत सुसाट निघून गेली. हे पाहून चालक इतका घाबरला की, तो काहीही करू शकला नाही. ही धडक इतकी भीषण होती की, व्हॅनच्या मागच्या बाजूचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातात व्हॅन गोल फिरून दुसऱ्या दिशेने जोरात फेकली गेली.

या भीषण अपघाताचा व्हिडीओ तर समोर आला; पण यात चालक वाचला की नाही हे स्पष्ट झालेले नाही. हा व्हिडीओ @TaraBull808 नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

एका युजरने लिहिले की, जर या माणसाने बॅरियर तोडले असते, तर त्याचा जीव वाचू शकला असता. दुसऱ्याने प्रश्न केला, “हा माणूस नक्कीच वेडा आहे.समोर मृत्यू पाहूनही तो गाडीतून का पळून गेला नाही.” तिसऱ्याने म्हटले, “असे अपघात अशा लोकांचेच होतात, ज्यांच्याकडे संयम नसतो.”