सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपलं मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडीओ अंगावर शहारा आणणारे असतात. तुम्हालाही वन्य प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ पाहायला आवडत असतील, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण रानावनात भटकून प्राण्यांसह माणसांची शिकार करणाऱ्या एका सिंहाचा अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिंहाने जे काही कृत्य केलं आहे ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल यात शंका नाही.
हो कारण नेहमी प्राण्यांची शिकार करणारा मांसाहारी सिंह व्हिडीओत चक्क झाडांची पाने खाताना दिसत आहे. जंगलाचा राजा सिंह हा मांसाहारी प्राणी आहे, मात्र सध्या एक मांसाहारी वाघ शाकाहारी झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर, सिंह कधीकधी पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी पाने आणि गवत खातात. या सिंहाचा व्हिडीओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये सिंह झाडाची पाने खाताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ शेअर करताना सुसंता नंदा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “होय, सिंह कधी कधी गवत आणि पाने खातात. हे आश्चर्याची बाब असू शकते, परंतु ते गवत आणि पाने का खातात याचं कारण म्हणजे ते पोटदुखीपासून आराम मिळावा म्हणून ते कधी कधी झाडांची पाने खातात.” जंगलाचा राजा कसा झाडाची पाने खाऊन पोट भरतोय, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सिंहाचा हा व्हिडीओ आतापर्यंत ४१ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने मजेशीर कमेंट करत लिहिलं आहे, “श्रावण महिन्यात हा भाऊ शाकाहारी झाला आहे.”