सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी ऑफिसच्या ऑनलाईन मिटींगमधील मजेशीर किस्से, तर कधी लहान मुलाने शिक्षकांना सुट्टीसाठी लिहिलेला अर्ज अशा अनेक घटना व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीने आपल्या प्रियकराला सॉरी म्हणण्यासाठी चक्क भलामोठा बॅनर लावला आहे.
खरं तर आपण आपल्या जवळच्या लोकांची माफी मागण्यासाठी, त्यांचा राग घालवण्यासाठी कधी, फुले, चॉकलेट्स देतो तर कधी हृदयस्पर्शी मेसेज पाठवतो. पण आता एका मुलीने तिच्या बॉयफ्रेंडला सॉरी म्हणण्यासाठी थेट रस्त्यावर भलामोठा बोर्ड लावला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. व्हायरल होत असलेल्या बोर्डवरती सुष नावाच्या मुलीने माफी मागण्याचा एक नवीन मार्ग शोधून काढला आहे, तिने आपल्या मित्राची माफी मागण्यासाठी नोएडामध्ये एक मोठा बोर्ड लावला आहे. ज्या बोर्डवरती तिने एका मोठ्या अक्षरात ‘सॉरी’ असं लिहिलं आहे.
अनोख्या बोर्डची सोशल मीडियावर चर्चा –
नोएडातील लोकांचे या भल्यामोठ्या बिलबोर्डने लक्ष वेधून घेतलं आहे. कारण या मोठ्या बोर्डवरती सर्वांना दिसेल अशा मोठ्या अक्षरात, “मला माफ कर संजू, मी तुला यापुढे कधीच दुखावणार नाही तुझीच सुष.” शिवाय या बोर्डवरती दोन मुलांचे लहाणपणीचे फोटोदेखील लावण्यात आले आहेत. मात्र, परंतु त्या दोघांना सध्या ओळखता येऊ शकत नाही. या बिलबोर्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. तर अनेकांनी हा बोर्ड आणि त्यावरील फोटो पाहिल्यानंतर हसू आवरणं कठिण झाल्याचं म्हटलं आहे.
हा व्हायरल फोटो @uDasKapital नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तर हा बोर्ड नोएडाच्या सेक्टर १२५ येथील मेट्रो स्टेशनजवळ लावण्यात आला आहे. परिसरात येणारे-जाणारे लोक त्या बोर्डचा फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. या पोस्टला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर फोटो व्हायरल होताच नेटकरी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने तर पुण्यात ५ वर्षापूर्वी लावलेला एक फोटो कमेंट बॉक्समध्ये शेअर केला आहे. तर नोएडातील काहीजण तरुणीने लावलेला बोर्ड आम्ही पाहिला असल्याचं म्हणत आहेत.