सोशल मीडियावर डिलीव्हरी बॉयशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही त्यांच्या प्रामाणिक कष्टाचे कौतुक करायला लावणारे, तर काही त्यांच्या विचित्र कृतीमुळे संताप आणणारे असतात. सध्या अशाच एका डिलीव्हरी बॉयचा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो फूड ऑर्डर पोहोचवण्यासाठी निघाला असताना ऑर्डर बॉक्समधील अन्न खाताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बॉय ग्राहकाचे अन्न खात असल्याचा दावा केला जात आहे. प्राऊड टू बी इंडियन नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन या डिलीव्हरी बॉयचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ५६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय ट्रॅफिक सिग्नलवर थाबलेला दिसत आहे. यावेळी तो इकडे तिकडे कोणाचं लक्ष आहे का बघतो आणि मागे असणाऱ्या बॉक्समध्ये हात घालतो आणि बॉक्समधील काही अन्न बाहेर काढतो आणि तोंडात टाकतो. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या एका कारमधील व्यक्तीने या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ शूट केला जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय काही नेटकऱ्यांनी या डिलिव्हरी बॉयवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय अनेकांनी ऑर्डर केलेले अन्न हा माणूस कसा खाऊ शकतो, असा प्रश्न विचारला आहे. मात्र काही नेटकऱ्यांनी मात्र तो खात असलेला अन्न त्याचे स्वत:चे असू शकते असं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे. “हे त्याचे अन्न असू शकते..सामान्यत: अन्न पॅक केलेले असते. त्यामुळे चुकीची माहिती पसरवू नका.”