कर्नाटकात एक हाती काँग्रेसची सत्ता आली आहे. नवीन सरकार स्थापन देखील झालं आहे. निवडणूका म्हटलं की सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी भरमसाठ आश्वासनं देत असतात. तशी कॉंग्रेसने देखील अनेक आश्वासनं दिली होती. पण आता काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांमुळे एका वीज कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्या कर्नाटकातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये “थकीत वीज बिल जमा करा” असं सांगायला आलेल्या वीज कर्मचाऱ्याला एका व्यक्तीने मारहाण केल्याचं दिसत आहे.
वीज कर्मचाऱ्याला मारहाण –
व्हायरल व्हिडिओमध्ये असे सांगितले जात आहे की, एक वीज कर्मचारी एका व्यक्तीकडून थकीत वीज बिलाची वसूल करण्यासाठी आला होता. दोघांमध्ये वाद झाला. यावेळी त्या व्यक्तीने वीज कर्मचाऱ्याला चापट मारली आणि काँग्रेसने वीज मोफत देण्याची घोषणा केल्याचे सांगत वीज बिल भरण्यासही नकार दिला.
काँग्रेसने दिले होते मोफत वीज देण्याचे आश्वासन –
सध्या कर्नाटकातून अशा अनेक घटना समोर येत आहेत. जिथे लोकांनी काँग्रेसने दिलेल्या आश्वासनाचे कारण देत वीज बिल भरण्यास नकार दिला आहे. लोकांचे म्हणणे आहे की २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते, आता काहीही झाले तरी आम्ही बिल भरणार नाही.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
@sonnalssinha नावाच्या युररने लिहिले आहे की, मोफत मिळणारे पैसे या देशाच्या प्रगतीला मारक आहेत. लोकांना काहीही मोफत देणे बंद करा, याबाबत नियम करा. कोणताही राजकीय पक्षाने फुकट काहीही देऊ नये. तर आणखी एकाने लिहिले की, एक महिला बस कंडक्टरशी भांडत होती की ती तिकीट खरेदी करणार नाही, कारण काँग्रेसने तिला मोफत प्रवासाचे वचन दिले होते. तर एका व्यक्तीने लिहिले आहे, “सरकारी कर्मचाऱ्यांना उष्णतेचा त्रास होत आहे. लोकांनी हे देखील समजून घेतले पाहिजे की, ते फक्त त्यांचे काम करत आहेत. ज्यांनी आश्वासने दिली त्यांना जाब विचारा, या गरीब कर्मचाऱ्यांना नाही.