Mother Saves Child From Crocodile : कोणाचे कोणावाचूनही अडत नाही, असे म्हणतात. पण, आई पाठीशी असली की, समस्याही अगदी मिनिटांत सोडवल्या जातात. आज आपण अशाच एका आईच्या धाडसी कृत्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत, जी वाचून कदाचित तुमच्याही अंगावर नक्कीच काटा येईल. एका महिलेने स्वतःचा जीव धोक्यात घालून, आपल्या पाच वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी चक्क मगरीशी झुंज दिली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील ढाकिया गावात ही घटना घडली. वीरू नावाचा मुलगा त्याच्या घराजवळील नाल्याजवळ खेळत असताना एका मगरीने पाण्याबाहेर येऊन त्याला पकडले. मगरीने जेव्हा मुलाला पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याची आई माया हिने आपल्या मुलाचे ओरडणे ऐकले आणि तिने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाच मिनिटांत जे घडले, तो खरोखरच जीवन-मरणाचा संघर्ष होता.
आई मायाने अगदी न घाबरता, स्वतःच्या जीवाचा जराही विचार न करता, मगरीचा सामना केला. मगर तिच्या मुलाला खेचत होती. पण, दुसरीकडे आईची शक्ती मुलाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. त्यानंतर एकदा हाताने आणि लोखंडी रॉडच्या प्रहारानंतर मगरीने मुलाला सोडले. त्यामुळे मुलगा वाचला आहे आणि अखेर आईच्या जीवात जीव आला. पण, या घटनेत माया आणि वीरू दोघेही जखमी झाले आहेत. मायाच्या जखमांवर उपचार करून, तिला घरी सोडण्यात आले; तर वीरूला गंभीर जखमांमुळे वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
माजी गावप्रमुख राजकुमार सिंग यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. विभागीय वनाधिकारी राम सिंग यादव आणि एसडीओ रशीद जमील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाला भेट दिली आणि त्या कुटुंबाला मदत केली. विभागीय वनाधिकारी राम सिंग यादव यांनी आश्वासन दिले की, मगरीचा शोध घेऊन, तिला पकडण्यासाठी एक विशेष मोहीम राबवली जाईल.