सध्या मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तिकीट तपासणी मोहिम जोरदार सुरु आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर चार ते पाच टीटीई कर्मचारी प्रवाशांचे तिकीट तपासण्यासाठी उभे असल्याचे दिसतात. यादरम्यान रेल्वे प्रवासी आणि टीटीईमधील वादाचे प्रसंग घडतात.ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले. यात आता मुंबईतील कांदिवली रेल्वे स्थानकांतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकावरील टीटी कर्मचाऱ्यांनी एका प्रवाशाला तिकीट नसल्याचे मारहाण करत एका खोलीत डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. कांदिवली रेल्वे स्थानकावर टीटीईंची गुंडगिरीवर आता अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून अनेक रेल्वे प्रवाशांनी आणि रेल्वे प्रवासी संघटनांनी संबंधीत टीटीईंविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगितले आहेत.

नेमकी घटना काय?

@RailYatriSevaS या एक्स अकाउंटवरुन एक पोस्ट करण्यात आली आहे, ज्यात लिहिले आहे की, कांदिवली रेल्वे स्थानकावरुन एक प्रवासी विना तिकीट प्रवास करत होता. यावेळी टीटीई कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले आणि त्याच्याकडे तिकीटबाबत विचारणा केली. पण त्याच्याकडे तिकीट नसल्याने टीटीई कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी उद्धट वर्तन केले. इतकेच नाही तर नंतर त्याला खोलीत डांबून ठेवत मारहाण केली.

यावेळी विना तिकीट प्रवास केल्याबद्दल प्रवाशाने जीपेद्वारे दंड भरतो असे सांगितले. पण त्यांनी त्याचे अजिबात ऐकून घेतले नाही आणि त्याला बेदम मारहाण केली. यानंतर एका खोलीत ओढून नेत त्याल तिथे कोंडून ठेवले. याप्रकरणी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच कायदा हातात घेणाऱ्या संबंधीत टीटीई कर्मचाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कांदिवली रेल्वे स्थानकावर टीटीईंची गुंडगिरी

तुम्ही व्हायरल व्हिडीओत पाहू शकता, रेल्वेचे तीन टीटीई कर्मचारी प्रवाशाच्या कॅलरला पकडून त्याला ओढत एका खोलीत घेऊन गेले, दोन टीटीई प्रवाशाबरोबर खोलीत गेले आणि बाहेरुन एका टीटीईने दरवाजा बंद केला. यावेळी रेल्वे स्थानकावर उपस्थिती रेल्वे प्रवाशांनी बाहेर उभ्या असलेल्या टीटीईला प्रवाशाबरोबर सुरु असलेली वागणूक अन्यायकारक असल्याचे असे सांगत दरवाजा उघडण्याची मागणी केली, पण त्या कर्मचाऱ्याने उडवाउडवीची उत्तर देत प्रवाशांना तिथून जाण्यास सांगितले. पण प्रवाशांचा राग अनावर होत असल्याचे पाहून अखेर टीटीईने दरवाजा उघडला. यावेळी आत कोंडून ठेवलेल्या प्रवाशाने बाहेर येऊन आतील दोन टीटीई कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण केल्याचे सांगितले. पण टीटीई कर्मचाऱ्यांचे प्रवाश्याविरोधातील हे अन्यायकारक वागणं कोणत्या कायद्याचा धरुन होते असा प्रश्न आता रेल्वे प्रवासी आणि प्रवासी संघटना उपस्थित करत आहेत.