कोकणात दरवर्षी गणेशोत्सवात एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय. कोकणातील अनेक वाडी-वस्त्यांमध्ये गणरायाच्या आगमनानंतर नमन, भजन, फुगडी, जाखडी नृत्य आणि शक्ती-तुरा यांसारख्या सांस्कृतिक कलांचे सादरीकरण केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भजन, फुगड्या, आरत्यांचे सूर ऐकायला मिळतात. यावेळी गौराईच्या आगमनानंतर महिला, तरुणी एकत्र येत पारंपरिक गाणी म्हणत फुगड्या खेळण्याचा आनंद घेताना दिसतात. अशाच प्रकारे कोकणातील महिलांच्या फुगडीच्या जुगलबंदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे; ज्यामध्ये दोन महिला फुगड्या खेळण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यातून कोकणातील महिला पारंपरिक पद्धतीने फुगडी खेळण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही नव्या पिढीच्या काळात जोपासत असल्याचे दिसून येत आहे.

गणेशोत्सवानिमित्त लाखो चाकरमानी आपला कामधंदा बाजूला ठेवत कोकणातील आपल्या मूळ गावी दाखल होतात. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर सहा दिवस उत्साह अन् भक्तिभावाने देवाची पूजा-अर्चा करतात. या काळात अनेक कोकणवासीय रात्र जागवत बाप्पाची आरती, भजन सादर करीत आशीर्वाद मागतात. यावेळी गौराईच्या आगमनानंतर महिलासुद्धा रात्र जागवत फुगड्या खेळण्याचा आनंद घेतात. यावेळी अनेक पारंपरिक गाणी म्हटली जातात. याचदरम्यान महिलांच्या फुगड्यांची जुगलबंदी म्हणजे एक प्रकारे थोडक्यात मजेशीर भांडण करण्याचाही एक प्रकार महिला सादर करताना दिसतात. विशेषत: सिंधुदुर्गातील मालवण, देवगड भागातील महिला फुगडी जुगलबंदी खेळताना दिसतात.

येडेश्वरी देवी चरणी लाखो भाविकांचा जनसागर
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौराईच्या आगमनानिमित्ताने काही महिला मालवणी भाषेत पारंपरिक गाणी म्हणत फुगड्या खेळण्याचा आनंद लुटत आहेत. यावेळी दोन काकू फुगड्यांची जुगलबंदी खेळत आहेत. या जुगलबंदीच्या वेळी दोघीही कुटुंबातील सून, सासू, मुलगी, मुलगा, दीर अशा अनेक नातेसंबंधांवर एकमेकांना प्रश्न, मिश्कील टिप्पणी करीत मजेशीर पद्धतीने भांडत आहेत. एकमेकींकडे हात दाखवून ताला-सूरात बोलून झाल्यानंतर त्या जमिनीवर तांब्या आपटत आहेत. या दोघींचाही फुगड्या खेळण्याचा उत्साह अनेकांना लाजवेल असा आहे. नऊवारी साडीत या दोन्ही काकू फुगड्यांच्या जुगलबंदीचा मनमुराद आनंद लुटत आहेत. तर बाजूला बसलेल्या इतर महिला, तरुणीही दोघींच्या जुगलबंदीला चांगली साथ देत आहेत.

कोकणातील सांस्कृतिक कलांचे उत्तम उदाहरण दाखवणारा हा व्हिडीओ chef_pratham_chavan आणि auspicious_designer_18 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये ‘फुगडी जुगलबंदी’ असे लिहिले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या मजेशीर, भन्नाट कमेंट्सदेखील केल्या आहेत. एकाने लिहिलेय की, लोककला, संस्कृती व परंपरा यांचं उत्तम उदाहरण… तर दुसऱ्या एकाने लिहिलेय की, बिचारा तांब्या… याशिवाय तिसऱ्या एकाने लिहिलेय की, हा खरा आनंद!