सोशल मीडियावर कधी-कधी अशा गोष्टी व्हायरल होतात, ज्याचे आश्चर्य वाटते आणि हसूही येते. मुंबई पोलिसांचे असेच एक ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे. मुंबई पोलीस विभाग नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना सर्जनशील उत्तरे देताना दिसतो. नुकताच महाराष्ट्र सरकारने नवीन ‘वाइन पॉलिसी’ मंजूर केली आहे, ज्याच्या अंतर्गत आता किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाइनची खरेदी आणि विक्री करता येईल. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाला भाजपाने विरोध केला असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. वाइनची विक्री शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“वाइन म्हणजे दारू नाही. वाइनची विक्री वाढली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हे केले आहे. भाजपा फक्त विरोध करते पण शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता संजय राऊत यांच्या या विधानावर एका यूजरने ट्विटरवर मुंबई पोलिसांना, “मी वाइन पिऊन गाडी चालवली तर मुंबई पोलीस मला जवळचा बार दाखवतील की मला तुरुंगात टाकतील? असा सवाल विचारला आहे.
“शरद पवारांनी खूप सोसलंय त्यामुळे तरूण पिढीला नशेत..”; वाइन विक्रीवरुन भाजपा आमदाराची टीका
नेटकऱ्याच्या या प्रश्नाला मुंबई पोलिसांनीही मजेशीर उत्तर दिले आहे. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले की, “सर, एक ‘जबाबदार नागरिक’ म्हणून तुम्ही मद्यधुंद अवस्थेत बारमधून उठून ड्रायव्हर असलेल्या गाडीत बसण्याची शिफारस करतो.” यासोबतच, “जर तुम्ही दारूच्या नशेत गाडी चालवली आणि ब्रेथलायझरमध्ये तुमच्या ड्रिंकमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळलं, तर तुम्हाला आमचे पाहुणे बनावे लागेल,” असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर सोशल मीडिया यूजर्सनीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने ‘इज्जत से ले जायेंगे’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरनेही कमेंट करत मुंबई पोलिसांचे उत्तर अगदी बरोबर असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने मुंबई पोलिसांबद्दल कमेंट करताना “खूप छान! किती विनोदाची भावना आहे! तुमचे ट्विट लिहिण्यासाठी तुम्ही एखाद्या विनोदी कलाकाराची नियुक्ती केली आहे का?” असा प्रश्न विचारला आहे.
वाइन आणि दारुमध्ये फरक आहे म्हणणाऱ्या अजित पवारांना रामदास आठवलेंचे उत्तर; म्हणाले, लोकांचे फार…
दरम्यान, राज्यातील द्राक्ष बागायतदार तसेच वाईन उद्योगास चालना देण्यासाठी आता सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फायदा व्हावा, तसेच, वाइन उद्योगास चालना मिळावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी दिली आहे. मात्र राज्यातील भाजपा नेत्यांनी या निर्णयाला विरोध करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.