देशातला जातीभेद संपण्यासाठी अजून दोन पिढ्यांचा कालावधी जावा लागेल असं स्पष्ट मत डॉ. सुरज एंगडे यांनी व्यक्त केलं आहे. सुरज एंगडे हे प्रख्यात आंबेडकरी विचारवंत, लेखक आणि संशोधक आहेत. एवढंच नाही तर दलितांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे असंही सुरज एंगडे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात सुरज एंगडे यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
काय म्हटलं आहे सुरज एंगडे यांनी?
“मी पत्र्याच्या घरात राहिलो आहे. आमचं घर म्हणजे हवामानाचं केंद्र होतं कारण घरातच बसूनच कळायचं की किती तापमान आहे. पत्र्याच्या घरात राहिलो तर पावसाचं पाणीही यायचं. त्यावेळी माझे आई वडील हे बादल्या आणि भांडी घेऊन नाचायचे. माझे वडील बँकेत शिपाई होते. मला लाज वाटायची. मी माझ्या वडिलांची मी खोटी आयडेंटीटी निर्माण केली. माझे वडील कलेक्टर आहेत, मी सांगायचो की ती दोन हॉटेल्स आमची आहेत. एक दिवस वडिलांना म्हणालो की तुम्ही क्लार्क आहात ना बँकेत ते म्हणाले नाही. मी शिपाई आहे.
माझे मित्र माझ्या जातीमुळे कधी घरी यायचे नाहीत
मी तेव्हा अनुभव घेतला की शाळेतले जे माझे मित्र होते ते कधीच माझ्या घरी आले नाहीत. शाळेत सहा तास निघून जायचे. पण शाळा संपल्यानंतर वर्गमित्र भेटायचे एकमेकांना. माझ्यासोबत ते कधीही घडलं नाही. कारण मला कुणी त्यांच्या घरी बोलावलं नाही. तुम्ही एखाद्या विशेष कॉलनीतून, नगरातून येत असाल तर मनात एक भावना असते की त्याच्यापासून लांब रहा. माझे मित्र माझ्या घरी कधी यायचे नाहीत. आलेच तर ते घरात यायचे नाहीत. जातीची संकल्पना किती घट्ट बसलेली असते डोक्यात हे मला कळलं. कारण मी जेव्हा दुसऱ्यांच्या घरी जायचो तेव्हा ते मला घरात घ्यायचे नाहीत. माझा एक ब्राह्मण मित्र होता त्याने मला कधीही घरात घेतलं नाही. फक्त एकाच जातीचा प्रश्न नसतो अनेक जातींचं योगदान असतं. असे मानसिक आघात आपण स्वीकारू लागतो.”
तुझ्याकडून नवं काही होणार नाही हे सांगणारा वर्ग खूप मोठा आहे
“एक अनुभव असाही घेतला की काहीही नवीन करायचं म्हटलं तर करू नको म्हणणाऱ्यांचा वर्ग बहुसंख्य होता. तुझ्याकडून होणार नाही असे बरेचजण सांगत. त्यामुळे काय होतं तुम्हाला स्वतःचं प्रेत स्वतःच्या खांद्यावर उचलावं लागतं आणि पुढे जावं लागतं.” असंही परखड मत सुरज एंगडे यांनी व्यक्त केलं.
जातीभेद संपण्यासाठी दोन पिढ्या जाव्या लागतील
“जातींची आत्ताची अवस्था काय याचा विचार केला तर एक उदाहरण देतो. वसमतमध्ये एक गाव आहे तिथले एक ८५ वर्षांचे वृद्ध मला सांगू लागले की गावकी करायचे. गावातलं जे काम दिलं तर ते करायचे. गावात एखादं जनावर मेलं तर ते काढणं, घाण काढणं हे काम ते करायचे. त्या बदल्यात धान्य मिळायचं. पैसा नावाचा प्रकार जातीकडे नव्हताच. आता ती अवस्था त्या गावात नाही. माझे वडील हे नववीपर्यंत शिकले आणि ते शिपाई होते. बँकेत ते क्लर्क कम वॉचमनचे काम करतो. आता मी शिकलो आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा दलितांना संधी मिळाली आहे तेव्हा त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. देशांमध्ये जातीभेद आहे तो इतक्यात संपणार नसल्याचे त्यावेळी म्हणाले. मात्र, बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना त्यांनी देशात राजकीय एकोपा शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. देशातील राजकीय पक्षांमध्ये उच्चवर्णीयांच्या हातात राजकीय पक्षांचे नेतृत्व कसं सामावलं गेलं आहे याबाबत त्यांनी भाष्य केले. एवढंच नाही तर जात संपण्यासाठी दोन पिढ्या जाव्या लागतील ” असंही मत सुरज एंगडे यांनी व्यक्त केलं.