Ukrainian Soldier Viral Photo: रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान युद्धाची सुरूवात होऊन तीन वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. त्यानंतर इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध, भारत-पाकिस्तानमधील तीन दिवसांचा संघर्ष आणि आता इराण-इस्रायल संघर्षामुळे जगावर युद्धाचे ढग दाटले आहेत. मात्र युद्धाचे परिणाम किती दाहक असतात आणि सैनिकांना त्यात काय काय भोगावं लागतं, याचं जिवंत उदाहरण समोर आलं आहे. युक्रेनच्या एका सैनिकाला २०२२ साली रशियात अटक झाली. तीन वर्षांनी नुकतीच त्याची सुटका झाली. त्यानंतर त्याचा तीन वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो व्हायरल होत आहे.
ओलेक्झांडर स्ट्रॅफन असं या सैनिकाचं नाव आहे. २०२२ साली त्याला अटक झाली होती. नुकतीच त्याची सुटका करण्यात आली आहे. यावेळी त्याचा पूर्वीचा आणि आताचा फोटो व्हायरल होत आहे. अटकेत असताना ओलेक्झांडरच्या फक्त शरीरावरच नाही तर त्याच्या मनावरही जखमा झाल्या. त्याच्यासह त्याच्या पत्नीनंही तीन वर्ष जे भोगलं, ते या फोटोंमधून दिसत आहे.
पहिल्या फोटोत युक्रेनियन वेशभूषेत पत्नीसह पोज देणारा ओलेक्झांडर दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, ते दोघेही ताजेतवाणे वाटत आहेत. मात्र दुसऱ्या फोटोत ओलेक्झांडर तीन वर्षातच वृद्ध झाल्याप्रमाणे दिसत आहे. त्याचा चेहरा रापला आहे. डोक्यावरचे केस गळले आहेत. तर दुसऱ्या बाजूला तीन वर्ष तणावात असलेली त्याची पत्नीही खंगलेली दिसते.
रशियातील पॉवर ऑफ पिपल या स्वयंसेवी संस्थेची कार्यकर्ती ओलेना झोलोटारियोवानं हे फोटो तिच्या फेसबुकवर शेअर केले आहेत. या फोटोंमधून युद्धाची दाहकता दिसून येत आहे. तसं गाझामध्ये उध्वस्त झालेल्या इमारती, अनाथ झालेली बालके, अन्नासाठी होणारी वणवण जगासमोर आली. मात्र सैनिकांनाही काय भोगावं लागतं, या मूर्तिमंत उदाहरण ओलेक्झांडरच्या फोटोमधून दिसत आहे.
सोशल मीडियावर ओलेक्झांडर स्ट्रॅफनचा फोटो व्हायरल होताच अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं म्हटलं की, तो माझ्या आजोबांसारखा दिसत आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, त्याचे केस गळले आहेत आणि पांढरेही झाले आहेत. आणखी एका युजरने म्हटलं की, युद्ध खरंच खूप वाईट आहे. युद्धातून कुणालाही लाभ होत नाही.