Uncle Funny Dance Video : सोशल मीडियावर लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स, तर कधी गाणी, अभिनय अशा गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काही व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, सोशल मीडियावर युजर्सदेखील त्याचे कौतुक करतात. आतापर्यंत तुम्ही विविध गाण्यांवर नाचतानाच्या महिलांच्या सर्वाधिक रील्स पाहिल्या असतील. पण, सध्या एका काकांच्या भन्नाट डान्सची रील व्हायरल होतेय, जी पाहून अनेक जण काका काय जबरदस्त नाचतायत, अशी प्रतिक्रिया देत आहेत. विशेष म्हणजे काका नाचत असताना काकू त्यांचा व्हिडीओ शूट करतायत.
अनेकदा अशा रील्स सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये पत्नी नाचत असते आणि बिचारा नवरा उभा राहून बायकोचा व्हिडीओ शूट करीत असतो. पण, या व्हायरल व्हिडीओत काहीसं उलटं पाहायला मिळतंय. इथे नवरा नाचतोय आणि बायको दूर उभी राहून, त्याची रील शूट करतेय.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नदीच्या पलीकडे उभे असलेले लोक काकांचा डान्स पाहून आनंद घेत आहेत. काका शर्ट आणि पँट घालून, ‘जानू तू मेरी जान’ गाण्यावर बेभान होऊन नाचतायत. तर, पिवळ्या साडीत उभ्या असलेल्या काकू त्यांचा व्हिडीओ शूट करीत आहेत. काका अगदी मनापासून उड्या मारत नाचतायत, तर काकू कोणतीही तक्रार न करता, प्रेमाने रील बनवीत आहेत.
काकांच्या डान्स स्टेप्स इतक्या जबरदस्त आहेत की, ते पाहून तुम्हालाही हसू येईल; पण ते मात्र कोण हसेल याची पर्वा न करता, बिनधास्त नाचण्यात गुंग आहेत. यावेळी दूर बसलेली दोन मुले रेकॉर्डिंग करून या संपूर्ण दृश्याचा आनंद घेत आहेत. खरंच, पती-पत्नीचा हा प्रेमळ व्हिडीओ पाहून अनेक जण आनंद घेत आहेत.
हा व्हिडीओ कानपूरचा असल्याचे सांगितले जात आहे, जो @kanpur_ka_ghumakkad_launda नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला आतापर्यंत लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. काकांचा नादखुळा डान्स पाहून युजर्स आनंद घेत आहेत. अनेकांनी मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिले, “काका त्यांच्या स्वतःच्या रीलमुळे नाही, तर या भावाच्या रीलमुळे व्हायरल झाले.” दुसऱ्याने म्हटले, “काका आयुष्याचा आनंद घेत आहेत.” कोणीतरी लिहिलेय, “किती गोंडस जोडपं आहे हे त्यांना पाहून मजा आली.”