आपण अनेकदा बाजारात मध खरेदी करण्यासाठी जातो, पण मध विकत घेताना सर्वांच्या मनात एकच प्रश्न येतो, तो म्हणजे आपण खरेदी करत आहोत तो मध शुद्ध असेल का? कारण बाजारात भेसळयुक्त मध मोठ्या प्रमाणात विकला जातो. त्यामुळे हा प्रश्न सर्वांच्या मनात येतो. अशा वेळी आपण खरेदी करत असलेला मध ओरिजनल आहे की नाही याची खात्री करुन घेणं आवश्यक असतं. मध विकणाऱ्यांनाही या गोष्टी माहीती असतात, त्यामुळे ते मधाची शुद्धता ग्राहकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात.
पण सध्या एका मध विकणाऱ्या आजोबांनी त्यांचा मध शुद्ध आहे हे सांगण्यासाठी असं काही केलं आहे, जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हो कारण सध्या कोलकात्यातील एका आजोबांनी मधाची शुद्धता सिद्ध करण्यासाठी २०० रुपयांच्या नोटेवर मध लावून त्या नोटेला चक्क आग लावण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
या व्हिडिओमध्ये एक आजोबा रस्त्याच्या कडेला मध विकायला बसल्याचे दिसत आहेत. यावेळी ते आपला मध शुद्ध असल्याचा दावा करत आहेत. मात्र, ग्राहकाला मधाची शुद्धता दाखवण्यासाठी ते दोनशे रुपयांची नोट घेतात आणि नंतर त्या नोटेच्या एका भागावर थोडा मध लावतात. ज्या ठिकाणी मध लावला आहे बरोबर त्याच्या खाली एक पेटवलेली काडी धरतात, आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी पेटवलेली काडी नोटेखाली धरली तरीही नोट जळत नसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, मध लावल्यानंतर नोट जळत नसेल तर तो मध शुद्ध आहे का? असा समोरचा व्यक्ती विचारताच, “नोट जळाली तर सगळा मध फेकून देईन” असं आजोबा म्हणत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मधाची शुद्धता तपासण्याच्या आजोबांच्या हा भन्नाट ट्रिकचा व्हिडीओ ‘इंडियन फूडी’ नावाच्या फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे, “कोलकात्यात १०० टक्के शुद्ध मधाची टेस्टिंग” सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत ८ मलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर शेकडो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं आहे, “पूर्णपणे नकली मध आहे, नकली मध खाणे टाळा.” तर दुसऱ्याने लिहिलं “कोणत्याही कागदावर लावलेले कोणतेही द्रव कधीही जळत नाही.”