United Airlines plane’s tire falls off during takeoff : अमेरिकेहून जपानला जाणाऱ्या प्रवासी विमानाच्या विचित्र अपघाताची एक घटना समोर आली आहे. युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाने सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरून टेक ऑफ केले. पण टेक ऑफनंतर अवघ्या काही सेकंदांत हवेतच चक्क विमानाचे चाक निखळले. या घटनेच्या वेळी विमानात २३५ प्रवासी आणि १४ क्रू मेंबर्स होते. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
युनायटेड एअरलाइन्सचे बोईंग 777-200 विमान सॅन फ्रान्सिस्कोहून उड्डाण घेऊन जपानला जात होते. यावेळी विमानाच्या डाव्या बाजूच्या मुख्य लँडिंग गियर असेंब्लीवरील सहा चाकांपैकी एक चाक निखळून थेट खाली पडले. विशेष म्हणजे हे चाक विमानतळाच्या पार्किंगमधील एका कारवर जाऊन पडले; ज्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे. चाक उंचावरून थेट कारवर जोरात कोसळल्याने कारच्या मागील बाजूचा चक्काचूर झाला आहे.
या घटनेनंतर विमान तातडीने पुन्हा धावपट्टीवर लॅण्ड करण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना त्या विमानातून सुखरूपरीत्या उतरवून, दुसऱ्या विमानात त्यांची व्यवस्था करण्यात आली. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
या घटनेनंतर एअरलाइन कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, हे विमान २००२ साली तयार करण्यात आले होते. चाक खराब असतानाही विमान सुरक्षितपणे उतरवता येऊ शकते अशाप्रकारे डिझाइन केले आहे. फेडरल अॅडमिनिस्ट्रेशनने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.