शाळेचा पहिला दिवस तुम्हाला आठवतो का? पाण्याने काठोकाठ भरलेले डोळे, आई बाबांपासून दुरावली जाण्याची भीती, नवीन जागेत वाटणारा पोरकेपणा असा संमिश्र अनुभव शाळेच्या पहिल्या दिवशी अनुभवायला मिळायचा. शाळेच्या पायरीवर आई बाबांचा घट्ट धरलेला हात कधी सोडूच नये असं वाटायचं. जर शाळेत आपल्यासोबत आई बाबांना नेता आलं तर..? हा प्रश्न सारखा मनात यायचा. शाळा सोडल्यानंतर कॉलेजला जाताना देखील असाच काहीसा अनुभव येतो. नवीन जागा, नवीन शिक्षक, नवीन मित्र मैत्रिणी यात सुरूवातीचे काही दिवस थोडे अवघड वाटतात. अशा वेळी आधार देणारे आई-बाबा पुन्हा एकदा जवळ असते तर किती बरं होईल ना! असेही विचार मनात येतात. आता याबाबतीत आपण थोडे अनलकीच आहोत म्हणा. पण चीनमधले विद्यार्थी याबाबत काही अंशी सुदैवी म्हणावे लागतील.
साऊथ सेंट्रल युनिव्हर्सिटी फॉर नॅशनॅलिटी हे कॉलेज पहिल्या वर्षांतील विद्यार्थ्यांच्या पालकांना सुरुवातीचे दोन दिवस आपल्या पाल्यासोबत राहण्याची मुभा देते. साधारण सप्टेंबरच्या पाहिल्या आठवड्यात इथे कॉलेज सुरू होतात. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी दूरवरून विद्यार्थी येतात. तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची कॉलेजच्या कॅम्पसमध्ये राहण्याची सोय कॉलेजतर्फे करण्यात येते. गेल्या सोळा वर्षांपासून पालकांना कॉलेजमध्ये राहण्याची मुभा देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना नवीन वातावरणात रुळण्यास मदत व्हावी आणि प्रवेश काळात पालकांची होणारी दगदग कमी व्हावी यासाठी ही सोय करण्यात आली आहे.