१ मे चा दिवस आपल्याकडे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. १९६० साली स्थापना झालेल्या आपल्या राज्याचा गौरव सगळया देशाला आणि जगाला सांगणारा हा दिवस.
१ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिनही असतो. हे जग चालवण्यासाठी राबणाऱ्या कष्टकऱ्यांच्या राबत्या हातांचा आणि त्यांच्या श्रमाची आठवण करून देणारा हा दिवस. या दिवसाचं महत्त्व कितीजणांना माहीत आहे? महाराष्ट्र दिनासोबत या दिवसाला सुट्टी घेण्याचं फक्त निमित्त देणारं प्रयोजन याशिवाय या दिवसाला जागतिक कामगार दिनाला आपण फार महत्त्व देत नाही. पण पाकिस्तानमधल्या एका हाॅटेलमालकाने कामगार दिनानिमित्त त्याच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना एक सरप्राईज् दिलं.
या हॉटेलचं नाव आहे ‘हॉट अँड स्पाईसी’ हॉटेल. हे एक चेन रेस्टाॅरंट आहे. या रेस्टोरंटच्या पाकिस्तानमध्ये अनेक शाखा आहेत. या हाॅटेलमधल्या कामगारांना या हाॅटलेमालकाने १ मेच्या दिवशी आश्चर्यचकित केलं.
एरव्ही हॉटेलच्या ग्राहकांना सेवा देणाऱ्या या हाॅटेलमधल्या कामगारांना या हाॅटेलनेच पार्टी दिली. याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
या हाॅटेलच्या सीईओ ने स्वत: सगळ्या वेटर्सना खाणं वाढलं. या सीईओ चं नाव आहे उमैर खान. आपल्यासाठी काम करणाऱ्या या सगळ्या कामगारांना त्याने खास मेजवानी दिली. एवढंच नाही तर त्या कामगारांना त्याने स्वत:च्या हाताने प्रेमाने जेवण वाढलंसुध्दा.
“हे सर्वजण माझ्यासाठी एवढे खपतात. हॉटेलच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करतात. त्यांना माझ्यातर्फे ही छोटीशी भेट आहे. ते माझ्यासाठी करत असलेल्या कामाच्या मानाने ही खूपच लहान भेट आहे.