Viral Video : वडील हे मुलांच्या आयुष्यातील मार्गदर्शक, असतात. ते मोठ्या कष्टांनी मुलांचे स्वप्न पूर्ण करतात. त्यांच्या शिस्तीमुळे घराला घरपण येतं. वडिलांचं प्रेम जरी शब्दात व्यक्त होत नसलं तरी ते संपूर्ण आयुष्यभर साथ देणारं असतं. ते आयुष्यभर मुलांच्या सुखासाठी आणि आनंदासाठी झटतात. स्वत:च्या आनंदाचा त्याग करत ते नेहमी मुलांचा विचार आधी करतात. म्हातारपणात जेव्हा वडील थकतात तेव्हा त्यांना मुलांच्या आधाराची गरज असते. अशावेळी मुलांची प्रत्येक चांगली कृती त्यांचा आनंद द्विगुणित करते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने त्याच्या वडीलांना वाढदिवसा निमित्त भन्नाट सरप्राइज दिले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की तरुण त्याच्या वडीलांना वाढदिवसानिमित्त गिफ्ट देतो. तो सुरुवातीला वडीलांच्या हातात एक बॉक्स देतो. त्या बॉक्समध्ये शूज दिसतात. जेव्हा ते शूज हातात घेऊन बघतात तेव्हा त्यांना शूजमध्ये एक चावी सापडते. ती चावी चारचाकी गाडीची असते. ते पाहून वडीलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. ते आनंदाने मुलाला मिठी मारतात. त्यानंतर गाडी बघण्यासाठी घराबाहेर येतात. गाडी कव्हर करून बाहेर उभी असते. जेव्हा गाडीवरचं कव्हर काढतात तेव्हा Skoda Kylaq गाडी डोळ्यासमोर पाहून वडीलांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यानंतर वडील आणि मुलगा केक कापतात आणि वडील गाडीसमोर नारळ फोडतात. त्यानंतर वडील हौशीने गाडी चालवताना दिसतात. या व्हिडीओवर लिहिलेय, “बापाचा वाढदिवस साजरा करणं, हे मुलासाठी एक स्वप्न असतं” सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बापाला आनंदी बघण्यात एक वेगळंच सुख असतं!”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काहींच्या आयुष्यात ते स्वप्नच राहून जातं मिस यू पापा” तर एका युजरने लिहिलेय, “बाबा मला तुमचा अभिमान आहे.” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.