video of bengaluru woman with 28 golden retrievers goes viral : बंगळूरुमध्ये एक महिला चक्क २८ गोल्डन रिट्रीव्हर्सना बरोबर घेऊन रस्त्यावर फिरायला बाहेर पडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. शहरातली आरटी नगर भागतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या महिलेची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. “२८ कुत्री, आणि एक मोठं मन. बंगळुरूच्या आरटी नगरमधील ‘श्वान प्रेमी’ काकूंना भेटा!” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.

या व्हिडीओला व्हाईस ओव्हर देण्यात आला आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलं की, “आम्ही बंगळूरुच्या आरटी नगरमध्ये एका महिलेला २८ गोल्डन रिट्रीव्हर्सबरोबर फिरताना पाहिले. ते सगळे एकसारखे आणि आनंदी दिसत होते. त्यांच्या ‘फरी फॅमिली’बरोबर किती शांत आणि हसतमुख दिसत होत्या. आजच्या जीवनात इमानदार मित्र मिळणे दुर्मिळ आहे, पण कधीकधी प्रेम आणि निष्ठा ही चार पायांवर येते.”

या व्हिडीओला ७.२ लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि यावर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओवर व्यक्त होणाऱ्या बऱ्याच लोकांनी या महिलेचं कौतुक केलं असून काहींनी त्यांचे या महिलेबरोबरचे आणि या श्वानांबरोबरचे अनुभव देखील सांगितले आहेत.

“मी बंगळूरुमध्ये राहतो. त्यांनी त्यांची इनोव्हा कार श्वानांसाठी कस्टमाइझ केली आहे. मी त्यांच्या प्रेमात पडलो,” असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे. “मी लहान असल्यापासून या महिलेला आणि श्वानांना पाहत आलो आहे, त्या खूपच चांगल्या व्यक्ती आहेत,” असे दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे.

गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांसंबंधी एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना पकडून कायमस्वरूपी निवारागृहात हलवण्याच्या पुर्वीच्या आदेशात बदल केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

सर्वोच्च न्यायालयात काय झालं?

दिल्लीतील एका लहान मुलीला भटका कुत्रा चावल्यानंतर रेबीज झाल्याच्या वृत्तावरून सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलैला स्वत:हून या प्रकरणी खटला दाखल करून घेतला. न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठात ११ ऑगस्ट रोजी याबाबत सुनावणी होऊन सर्व भटके श्वान हटवून निवारा केंद्रांमध्ये बंद करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या आदेशाबाबत देशभर प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त करत निदर्शने केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी नव्या खंडपीठाची स्थापना करत आधीच्या आदेशांमध्ये सुधारणा केली.

दिल्लीमधील भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय विशेष खंडपीठात सुनावणी झाली होती. यावेळी निर्बीजीकरण, लसीकरण, जंतनाशक औषध दिल्यानंतर निवारा केंद्रातील भटक्या कुत्र्यांना सोडून देण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले. मात्र त्याचबरोबर मोकाट कुत्र्यांबाबत एक देशव्यापी धोरण सरकारला सुचिवण्याचा मानस खंडपीठाने व्यक्त केला होताय.