दर दिवशी आपण जेवत असतो. नवीन पदार्थ खात असो. ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे अशी मंडळी सतत काहीतरी नवीन, वेगळे व सर्वांना आवडतील, असे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु, या सर्वांमध्ये अशी काही मंडळी आहेत की, ज्यांना वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात; परंतु ते पदार्थ सर्वांनाच आवडतील किंवा पटतील, असे नसतात.

याचे ताजे उदाहरण घ्यायचे झाले, तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओबद्दल बोलू. लहानपणी किंवा अजूनही पारले-जी आणि लिटील हार्ट्स ही बिस्किटे अजूनही भरपूर लोकप्रिय आहेत. परंतु, एक्स [पूर्वीची ट्विटर] या सोशल मीडिया माध्यमावरून @desimojito या अकाउंटवरून शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये एक स्त्री चक्क पारले-जी आणि लिटील हार्ट्स ही बिस्किटांपासून हलवा बनवत असल्याचे दिसते आहे.

हेही वाचा : अरे देवा! विचित्र पदार्थांमध्ये अजून एकाची भर… सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सफरचंद इडलीचा व्हिडीओ पाहिलात का?

या व्हिडीओच्या सुरुवातीला एका पॅनमध्ये लिटील हार्ट्स आणि पारले-जीची बिस्किटे घालून घेऊन, त्यामध्ये दूध आणि दोन मोठे चमचे तूप घातल्याचे पाहायला मिळते. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये कोरड्या खोबऱ्याचे काही तुकडेदेखील घालण्यात आले आहेत. व्हिडीओमधील महिला, आपल्या सासऱ्यांना गोडाव्यतिरिक्त बाकी काही आवडत नसायचे. त्यामुळे त्यांच्यासाठी खास हा बिस्किटांचा हलवा ती बनवत असे, असे सांगत आहे.

हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर अर्थातच ‘फूडी’ लोकांचे या पदार्थाकडे लक्ष वेधले गेले. त्यांनादेखील या पदार्थावर हसावे की रडावे हे समजेनासे झाले असावे. कारण- काहींनी यावर विनोद केले असून, काहींना यांसारख्या सर्व पदार्थांची चीड येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नेटकऱ्यांच्या या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकाने, “हे काय आहे?!” असा उपरोधात्मक प्रश्न विचारला. त्यावर ज्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्याने “विष” असे मिश्कील उत्तर दिले. दुसऱ्याने, “तुम्हाला माहीत तरी आहे का की, यामध्ये केवढे घटक पदार्थ असू शकतात. पाकिटावर लिहिलेले असते की, ही बिस्किटे गरम करू नका. तुम्ही काय खात असाल याची कल्पनादेखील करता येणार नाही” अशी काळजी केलेली दिसते. त्यासोबतच अनेक चित्र-विचित्र प्रतिक्रियांनी या व्हिडीओखालील सेक्शन भरले आहे.