Video Passenger beaten up on IndiGo flight from Mumbai to Kolkata: मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाला पॅनिक अॅटॅक आल्याने शेजारच्या प्रवाशाने त्याला कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सहप्रवाशाला कानशिलात मारणाऱ्या प्रवाशाबद्दल इतर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. यादरम्यान, व्हिडिओमध्ये एअरहोस्टेस त्या प्रवाशाला असे कृत्य न करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. दरम्यान, व्हिडिओमध्ये ज्या प्रवाशाला मारहाण झाली तो मोठ्याने रडताना दिसत आहे.
इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E138 लँड झाल्यानंतर ही घटना घडली. दरम्यान, प्रवाशाला कानशिलात मारणाऱ्याला कोलकाता विमानतळावरील सुरक्षा पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
असे बेशिस्त वर्तन…
ही घटना उघकीस आल्यानंतर इंडिगोने एका अधिकृत निवेदनात प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “आमच्या एका विमानात झालेल्या हल्ल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. असे बेशिस्त वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि आमच्या प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला आणि प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणाऱ्या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.”
“संबंधित हल्ला करणाऱ्या प्रवाशाला बेशिस्त घोषित करून विमानतळाच्या सुरक्षा पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रोटोकॉलनुसार, सर्व संबंधित नियामक संस्थांना याची माहिती देण्यात आली आहे. आमच्या सर्व विमानांमध्ये सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरण राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत”, असे निवेदनात पुढे म्हटले आहे.
कोण आहे पीडित?
या घटनेतील पीडित प्रवाशाचे नाव हुसेन अहमद मजुमदार असे आहे. मुंबईतील एका जिममध्ये काम करणारा हुसेन हा आसामच्या कछार जिल्ह्यातील काटीगोरा येथे घरी परतत असताना ही घटना घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून असे दिसून येते की त्यावेळी हुसेनला पॅनिक अॅटॅक आला असावा. सहप्रवाशांनी आणि एअरलाइनच्या क्रू मेंबर्सनी तात्काळ या हल्ल्याचा निषेध करत मारहाण करणाऱ्या प्रवाशाला सुनावले.
पीडित प्रवाशाचे नातेवाईक चिंतेत
या घटनेनंतर हुसेन कोलकाताहून सिलचरला कनेक्टिंग फ्लाइटने जाणार होता, परंतु तो कोलकात्याला अद्याप पोहोचलेला नाही. सिलचर विमानतळावर त्याची वाट पाहत असलेले त्याचे कुटुंबीय अस्वस्थ आहेत कारण त्याचा फोन बंद असल्यामुळे त्याच्याशी संपर्क झालेला नाही.
पीडित प्रवाशाचे नातेवाईक झुबैरुल इस्लाम मजुमदार यांनी या प्रकरणावर निराशा व्यक्त केली आणि म्हटले की, “जेव्हा आम्हाला तो सिलचर फ्लाइटमध्ये सापडला नाही, तेव्हा आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि सिलचर विमानतळाजवळील उधरबंद पोलीस ठाण्यात गेलो. पण त्याच्या ठावठिकाणाबद्दल आम्हाला कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.”