Video Shows Family finds dead cockroach in meal : वंदे भारत ट्रेनचे आकर्षण अनेक प्रवाशांना आहे. सामान्य ट्रेनपेक्षा या ट्रेनमध्ये अनेक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ट्रेनमधून प्रवाशांना प्रवास करणे सोईस्कर वाटते. पण, वंदे भारत ट्रेनची दुसरी काळी बाजू म्हणजे अनेकदा व्यवस्थित जेवण मिळत नाही वा दूषित जेवण मिळते, अशा तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात असतात. या पार्श्वभूमीवरील एक व्हिडीओ (Video) आज व्हायरल होत आहे. प्रवासादरम्यान देण्यात आलेल्या जेवणात ‘मेलेले झुरळ’ आढळले, अशी तक्रार प्रवाशाने भारतीय रेल्वेच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडे केली आहे. हे नेमकं कसं घडलं, कधी घडलं याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

१९ ऑगस्ट रोजी शिर्डी ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या गाडीतून एक कुटुंब प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांना रेल्वे खान-पान सेवेकडून दिल्या गेलेल्या जेवणात ‘मेलेले झुरळ’ आढळले. हे धक्कादायक दृश्य पाहून कुटुंब घाबरले आणि त्यांनी भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नक्की काय घडलं ते व्हायरल पोस्टमधून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…कोब्रा विरुद्ध वाघ! जंगलात दोन प्राणी एकमेकांसमोर आले अन्… VIDEO तून पाहा कोणी घेतली माघार?

पोस्ट नक्की बघा…

प्रवाशाची रेल्वे अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार :

प्रवासी रिक्की जेसवानीने एक्स (ट्विटर)वर रेल्वेकडून पुरविल्या जाणाऱ्या खान-पान सेवेकडून पुरविण्यात येणाऱ्या भोजन व्यवस्थेची दुरवस्था स्पष्ट केली आहे. प्रवासादरम्यान रेल्वेकडून दिलेल्या डाळीमध्ये ‘मेलेले झुरळ’ आढळले, अशी कॅप्शन देऊन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. तसेच व्हिडीओमध्ये जेवणाबाबत भारतीय रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. “मी जेवत होतो. तेव्हा काकू म्हणाल्या की, तिला जेवणातील डाळीत झुरळ सापडले. माझ्या ८० वर्षांच्या आजोबांकडेही तेच जेवण होते. मग मलाही तेच जेवण मिळाले असेल का,” असे त्या प्रवाशाने संतप्त होऊन विचारले. दरम्यान, एक्स (ट्विटर) युजर दिव्येश वानखेडकरने जेसवानी यांच्या घटनेशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. मेलेलं झुरळ पडलेल्या डाळीच्या चित्राऐवजी त्यांनी इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) कडे दाखल केलेल्या तक्रारीचा फोटो या पोस्टमधून शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही पोस्ट पाहून आयआरसीटीसी ( IRCTC)ने देखील रिप्लाय केला आहे. “सर, तुम्हाला झालेल्या गैरसोईबद्दल मनापासून खेद वाटतो. या प्रकरणाकडे आम्ही अतिशय गांभीर्याने लक्ष देऊ. या प्रकरणी संबंधितांनाही दंडही ठोठावण्यात आला आहे. स्वयंपाकघरातील युनिटची कसून तपासणी सुरू आहे आणि त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे”, असे आयआरसीटीसी (IRCTC)ने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @Divyesh Wankhedkar यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.