आपल्या पतीच्या उपचारासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या एका महिलेच्या संघर्षाची कहाणी समोर आली आहे. या महिलेचा पती रस्ते अपघातात कोमात गेला असून मागील तीन महिन्यांपासून त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या उपचारासाठी खूप खर्च झाल्यामुळे या महिलेने आपले घरही विकले आहे. या महिलेचा पतीवर रुग्णालयात उपचार सुरु असल्यामुळे तिला आणखी पैशांची गरज आहे.
हे पैसा उभा करण्यासाठी आणि आपल्या पतीला जीवनदान मिळावं यासाठी या महिलेने चक्क रस्त्यावर उतरुन काम करायला सुरुवात केली आहे. तिच्या या कृतीचं सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जातं आहे. या महिलेने पतीच्या उपचारासाठी पैसा उभा करण्यासाठी फूटपाथवर फास्ट-फूड (मोमोज) विकायला सुरुवात केली आहे. यातून तिला जे काही पैसे मिळतात ते पतीच्या उपचारावर खर्च करत आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, नि (Nie) आडनाव असलेली ही महिला चीनच्या दक्षिण-पूर्व प्रांतातील जिआंगशी येथील रहिवासी आहे. २०१६ मध्ये तिचं लग्न झालं होतं तिला सध्या दोन मुलं आहेत. तीन महिन्यांपूर्वी या महिलेच्या पतीच्या कारचा अपघात झाला, तेव्हापासून तो रुग्णालयात दाखल आहे. दरम्यान त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने ते कोमात गेला. अपघातानंतर, या महिलेच्या पतीची तीन ऑपरेशन करण्यात आली त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च झाले. पतीच्या या उपचारांसाठी महिलेला स्वत:च घर विकाव लागलं. मात्र, मुलांचा खर्च आणि आणि उपचारासाठी पैसे जमवण्यासाठी तिने फूटपाथवर फास्टफूड विकायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा- जेवणात केस सापडला म्हणून संतापलेल्या नवऱ्याने पत्नीचं टक्कल करत केलं भयंकर कृत्य
या महिलेच्या संघर्षाची कहाणी आता टिकटॉकवर व्हायरल होत आहे. ७ डिसेंबरच्या एका पोस्टमध्ये Nie ने म्हटलं आहे की, ‘कितीही कठीण असले तरी, मला जे हवे आहे ते मला मिळेल. मी पतीवर प्रेम करते, काहीही कष्ट करुन त्याला वाचवेन. त्यांच्या परतण्याची मी वाट पाहत आहे. मी एक दोन नव्हे तर वर्षांनुवर्ष त्यांची वाट पाहण्यास तयार आहे.’ दरम्यान, आपल्या पतीची प्रकृती सुधारली असून तो लवकरच शुद्धीत येण्याची अपेक्षा आहे, असंही Nie म्हणाली आहे.