Elderly Couple Love Story Viral : तुम्ही एखादी गोष्ट मनापासून करण्यास तयार असाल तर त्यासाठी तुम्ही कोणत्याही वयात त्यासाठी सुरुवात करू शकता. मग ते शिक्षण, व्यवसाय, नोकरी किंवा अगदी लग्न करण्याचाही निर्णय असो; तर आज सोशल मीडियावर एका खास लग्नातील फोटो व्हायरल होत आहेत. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असे म्हटले जाते. घाई-गडबडीत निर्णय घेण्यापेक्षा योग्य जोडीदाराची वाट बघणे केव्हाही चांगले बरोबर ना… तर आज एका वृद्ध जोडप्याने ७० व्या वर्षात एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली आहे.
केरळमधील सरकारी वृद्धाश्रमात भेटलेल्या एका वृद्ध जोडप्याने लग्न केले आहे. तर झाले असे की, ७९ वर्षीय विजयराघवन आणि ७५ वर्षीय सुलोचना यांची भेट एका सरकारी वृद्धाश्रमात झाली. विजयराघवन २०१९ पासून वृद्धाश्रमात राहत होते, तर सुलोचना २०२४ मध्ये तिथे स्थलांतरित झाली. कालांतराने त्यांची मैत्री झाली, हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात बदलली.
मैत्री प्रेमात बदलल्यानंतर त्यांचे नाते आणखीन घट्ट झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ७ जुलै २०२५ रोजी या जोडप्याने कायद्याअंतर्गत लग्न केले. केरळचे उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू, शहराचे महापौर एम. के. वर्गीस आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. सोशल मीडियावर या जोडप्याच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
पोस्ट नक्की बघा…
खरं प्रेम कधी वेळ पाहत नाही, त्याला वयाचंही बंधन नसतं काही (Viral Post)
विजयराघवन यांनी पांढरी धोती आणि सदरा तर सुलोचना यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. आजोबांनी मंगळसूत्र घालून आजीला अर्धांगिनीचा मान दिला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना हार घातला आणि हा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या खास जोडप्याची कहाणी पाहून नेटकरीही प्रेमात पडले आहेत आणि “खरं प्रेम कधी वेळ पाहत नाही, त्याला वयाचंही बंधन नसतं काही.” “आपल्यासारख्या लोकांसाठी ही प्रेरणा आहे”; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. सोशल मीडियावर ही पोस्ट @chinna_basha_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.