Viral Photo Shares Disabled Zomato Delivery Boy : काही गोष्टी अशा घडतात, ज्या आयुष्यभरासाठी एखाद्याला जीवनाचा खरा अर्थ सांगून जातात. त्यामुळे अपयशाने किंवा वाईट प्रसंग वा परिस्थिती आल्यावर खचून न जाता त्यातून मार्ग काढणे, नवीन काहीतरी शिकत राहणे, त्यातून आनंद शोधणे महत्त्वाचे असते. तर आज असाच एक प्रसंग पुण्यातील एका रहिवाशानं अनुभवला.

तर घडलं असं की, पुण्याचे रहिवासी श्रीपाल गांधी यांनी सबवेवरून पनीर टिक्का सँडविच, बिंगो चिप्स, ओट्स, मनुका, कुकीज असं जेवण ऑर्डर केलं. पण, डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला तेव्हा त्यात फक्त सँडविच होते कुकीज आणि चिप्स त्यांनी दिलेच नाहीत. श्रीपाल गांधी यांनी त्याबद्दल डिलिव्हरी बॉयला विचारताच त्यानं अगदी नम्रपणे अडखळत, उत्तर देण्यासाठी धडपडत ‘सबवे’ किंवा ‘झोमॅटो’ला फोन करण्यास सांगितलं. त्यानंतर श्रीपाल गांधी यांनी ‘सबवे’ला फोन केला तेव्हा त्यांनी माफी मागितली आणि डिलिव्हरी बॉयला परत पाठविण्याची विनंती केली आणि आणखीन २० रुपये देऊ ; असेसुद्धा आवर्जून सांगितले.

पण, इथेच एक ट्विस्ट आला. तांत्रिकदृष्ट्या ‘झोमॅटो’ने सांगितल्याशिवाय डिलिव्हरी बॉय परत जाऊ शकत नाही. कारण- त्याला ‘झोमॅटो’ पैसे देते; ‘सबवे’ नाही. पण, डिलिव्हरी बॉयने ग्राहकाच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी तो पुन्हा ‘सबवे’कडे गेला आणि राहिलेले पदार्थ घेऊन पुन्हा श्रीपाल गांधी यांच्या घरी आला. एवढेच नाही, तर ‘सबवे’ने दिलेले २० रुपये घेण्यासही त्याने नकार दिला. कारण- “देवाने त्याला खूप काही दिले आहे. दुसऱ्याने केलेल्या चुकीसाठी त्याने हे पैसे का घ्यावे”, असे त्याचे म्हणणे होते.

त्यानंतर मग डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला स्वतःची गोष्ट सांगण्यात सुरुवात केली. ‘झोमॅटो’ बॉय एकेकाळी बांधकाम पर्यवेक्षक (सुपरवायझर) होता. त्यानंतर शापूरजी पालनजी येथे तो व्यवस्थापकीय पदावर महिन्याला १.२५ लाख रुपये पगार घेऊन काम करीत होता. पण, एका कार अपघातानं त्याचं सगळं आयुष्य बदललं. त्याच्या शरीराच्या डाव्या भागाला अर्धांगवायू झाला. हात-पायांना लकवा मारला. त्यामुळे त्यानं त्याची नोकरी गमावली. तेव्हा झोमॅटोनं त्याच्या कुटुंबाला ‘जिवंत’ ठेवले. अपंग असूनही त्याला काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे तो ‘झोमॅटो’चे नाव कधीही खराब होऊ देणार नाही, असे त्याने निक्षून सांगितले.

पोस्ट बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/share/16dPArVdVP

स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला आणि… (Viral Photo)

झोमॅटो बॉयची लेक दंतचिकित्सा शिकत आहे. केवळ उत्पन्नासाठी नाही, तर लेकीचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी तो सायकलवरून झोमॅटोच्या ऑर्डर पोहोचवतो. त्यानं आयुष्याला दोष दिला नाही वा तक्रार केली नाही. त्याऐवजी चेहऱ्यावर हसू ठेवून, त्यानं स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला आणि म्हणाला “देव माझ्याबरोबर असताना मी काळजी का करावी?”, असं म्हणत त्यानं दीपिंदर गोयल आणि झोमॅटो टीमला धन्यवाद दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्याचा रहिवासी श्रीपाल गांधी यांनी हे सगळं ऐकून घेतल्यानंतर झोमॅटो बॉयचा एक फोटो काढला आणि पोस्टमध्ये त्याची गोष्ट सविस्तरपणे लिहिली. तसेच कॅप्शनमध्ये ‘तुम्हाला कदाचित हे कळणार नाही. पण, डिलिव्हरी बॉयनx आज फक्त सँडविच नाही, तर आयुष्यभरासाठी एक धडा दिला आहे; जो म्हणजे कृतज्ञता, लवचिकता आणि आशा’ असं म्हटलं आहे. तसेच सोशल मीडियावर ही पोस्ट @Shripal Gandhi या फेसबुक अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.