Viral Video Duduma Waterfall Incident : रीलच्या नादात कोण काय करू शकतं याचा काहीच अंदाज करू शकत नाही. अनेक जण रील रेकॉर्ड करून, सोशल मीडियावर पोस्ट करून लाइक्स, कमेंट्ससाठी जीवाची बाजी लावायलाही तयार असतात. त्यासाठी ते धोकादायक ठिकाणी जाऊन विचित्र स्टंट करताना दिसतात. अशीच एक घटना आज ओडिशामध्ये घडली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये काही मित्र मिळून धबधब्यावर गेले आहेत आणि रील शूटदरम्यान त्यांचा मित्र पाण्यात वाहून गेला आहे.
शनिवारी दुपारी कोरापुट जिल्ह्यातील डुडुमा धबधब्याजवळ ही घटना घडली आहे. रील बनवताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ओडिशाच्या बेरहामपूर येथील २२ वर्षीय यूट्यूबर बेपत्ता झाला आहे. सागर टुडू असे या यूट्यूबरचे नाव असून, तो मित्राबरोबर स्थानिक पर्यटनस्थळांच्या रील तयार करण्यासाठी डुडुमा धबधब्याजवळ गेला होता. ‘प्रमेय न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, धबधब्याच्या काठाजवळ सागर ड्रोनने फुटेज कॅप्चर करीत असताना अचानक पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे.
मुसळधार पावसानंतर माचकुंडा धरणाचे पाणी सोडण्यात आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली. त्यामुळे या भागात पाण्याची पातळी वाढली. अधिकाऱ्यांनी नदीच्या खालच्या भागात राहणाऱ्या रहिवाशांना सूचना जारी केल्या होत्या. पण, तरीही व्हायरल व्हिडीओतील यूट्यूबर रील बनवण्यासाठी गेला आणि जलद प्रवाहामुळे सागर तिथेच अडकला. त्याचे मित्र, काही प्रत्यक्षदर्शी आणि पर्यटक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. पण, प्रवाहाच्या वेगामुळे तो क्षणार्धात वाहून गेला आणि घटनास्थळी पाहणारे केवळ ते दृश्यच बघत राहिले.
व्हिडीओ नक्की बघा…
माचकुंडा पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. पण, नवीन अपडेटनुसार, शोधकार्यादरम्यान, यूट्युबर अद्याप सापडला नाही, असे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @manas_muduli या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा “लोक कंटेंट तयार करण्यासाठी आपला जीव का धोक्यात घालत आहेत?” , “पूर्णपणे मूर्खपणा आहे. पावसाळ्यात धबधब्यांवर जाण्याचा धोका पत्करू नये”, “रील कल्चर सगळं संपवून टाकणार आहे”, “निसर्ग आपोआप मूर्ख लोकांना या जगातून कमी करतो” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.