80 Years Old Women Climbed Over 10,000 Steps At Girnar Viral Video : दररोज मंदिरात जाणे, देवाचे दर्शन घेणे, असा अनेक लोकांचा दिनक्रम असतो. काही जण सुट्या काढूनसुद्धा वेगवेगळ्या राज्यांतील विविध मंदिरांना भेट देत असतात. सध्याची काही तरुण मंडळीसुद्धा देवधर्माकडे आकर्षित होताना दिसत आहेत. तरुणपणात उत्साह आणि ताकद भरपूर असते. त्यामुळे आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतो. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ८० वर्षीय आजीने कमाल करून दाखवली आहे.
गुजरातमधील पवित्र गिरनार जैन तीर्थावर १० हजारहून अधिक पायऱ्या आहेत. तिथे मध्य प्रदेशमधील नीमच येथे राहणाऱ्या ८० वर्षीय सुनीता चौधरी यांनी जाण्याचे ठरवले. विशेष बाब म्हणजे त्या फक्त ठरवूनच थांबल्या नाहीत, तर त्या कोणत्याही आधाराशिवाय १० हजार पायऱ्या चढल्या. अशा प्रकारे त्यांनी आरोग्य, भक्ती व दृढनिश्चयाचे एक प्रेरणादायी उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे.
सात्विक आहार आणि जीवनशैली (Viral Video)
अनेकदा देवदर्शन घेण्यासाठी रांग लागावी लागेल किंवा शिड्या चढाव्या लागतील म्हणून आपण पैसे देऊन व्हीआयपी दर्शन घेतो किंवा रोप-वेचा वापर करतो. पण, ८० वर्षीय आजीने सगळ्यांना मागे टाकत, कोणाचीही मदत न घेता, गिरनार जैन तीर्थावर चढून सगळ्यांनाच थक्क करून सोडले आहे. सुनीता अनेक आध्यात्मिक साधनांमध्ये व्यग्र असतात, ज्यामध्ये अनेक वेळा उपवास आणि इतर पवित्र स्थळांना भेट देणे समाविष्ट असते.
व्हिडीओ नक्की बघा…
८० वर्षीय सुनीता चौधरी यांचा मुलगा भूपेंद्र चौधरीने आईच्या आध्यात्मिक प्रवासातील समर्पणाबद्दल अभिमान व्यक्त केला. तो म्हणाला की, सामान्य माणसाला पायऱ्या चढण्यासाठी १० तास लागतात. पण, आजीने सहा तासांत गिरनार तीर्थ चढून दाखवले आहे. सात्त्विक आहार आणि नियमित दिनचर्या त्यांच्या जीवनशैलीतील ऊर्जेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते. १५ वर्षांपासून त्या दिवसातून फक्त एकदाच जेवतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @FreePressMP या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.