Viral Video: हल्लीचा बदलणारा काळ बघता प्रेम, लग्न फार काळ टिकत नाहीत, त्यामुळे ते दोघं एकमेकांना आयुष्यात कितपत साथ देतील हे सांगता येत नाही. अनेकदा सोशल मीडियावर वृद्ध जोडप्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये त्यांचे प्रेम पाहून आपल्यालाही हेवा वाटतो. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

प्रेम ही एक खूप सुंदर आणि निर्मळ भावना आहे. ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो. पण, हल्ली असं निर्मळ आणि नि:स्वार्थी प्रेम फार क्वचित पाहायला मिळतं. अलीकडच्या काळातील अनेक तरुण-तरुणींना प्रेम म्हणजे केवळ एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करणं याच गोष्टींकडे लक्ष असतं, त्यामुळे जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्यावेळी ते नातंदेखील तुटतं. पण, आपल्या आधीच्या पिढीसाठी प्रेम केवळ अपेक्षा पूर्ण करणं नसून एकमेकांच्या सुख-दुःखात एकमेकांना साथ देणं, परिस्थिती समजून घेणं, कधीतरी आपल्या जोडीदारला एखादी गोष्ट आवडते म्हणून त्याच्यासाठी ती आवडीने करणं, याला खरं प्रेम म्हणतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजी-आजोबांचा शेतामध्ये खास व्हिडीओ शूट करण्यात आला असून यावेळी व्हिडीओच्या सुरुवातीला आजी-आजोबा बैलगाडीमध्ये बसलेले दिसत आहेत, त्यानंतर ते शेतामध्ये फिरताना दिसत आहेत. त्यांच्या या सुंदर क्षणांना व्हिडीओमध्ये “झालं झुंजूमुंजू उजळून आल्या दिशा गं” हे गाणं लावण्यात आलं आहे. हल्ली अनेक जोडपी लग्नापूर्वी अशाप्रकारे प्री-वेडिंग फोटोशूट करतात. परंतु, आजी-आजोबांचे हे सुंदर फोटोशूट पाहून अनेकजण कौतुक करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vishal_vk_dxb या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास नऊ लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीच्या विचारांना अंतःकरणातून सलाम, भावना दाटून आल्या.” दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “ते prewedding करण्यापेक्षा या वयापर्यंत संसार करून post wedding करणं खूप अवघड आहे.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “मला माझ्या आजी-बाबांची आठवण आली, दोघे पण असेच होते.”