Viral Video Police Officer Arrest Delivery Agent : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये सिग्नल बसवण्यात येतात. सिग्नलवर अती घाई करणे किंवा सिग्नल तोडणे प्रत्येक वाहन चालकांसाठी आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी धोकादायक ठरते. वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, वाहन चालवताना हेल्मेट घाला,असे वारंवार वाहतूक पोलीस नागरिकांना सूचना देत असतात. तर आज अशाच एका डिलिव्हरी बॉयला वाहतुकीचे नियम मोडताना पकडण्यात आले आहे. पण, याचबरोबर पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन घडले आहे.
व्हायरल व्हिडीओ अमेरिकेतील आहे. ४ जुलै २०२५ रोजी ऑर्डर देण्यासाठी जाताना बेपर्वा गाडी चालवल्याबद्दल एका डिलिव्हरी करणाऱ्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली. पण, अन्न वाया जाऊ देण्याऐवजी, टेम्पे पोलिस विभागातील अधिकाऱ्यांनी ग्राहकाला पिझ्झा पोहोचवण्याची जबाबदारी स्वतः कडे घेतली.पण, जेव्हा दोन अधिकारी पिझ्झा पोहचवायला ग्राहकाच्या घरी पोहचले. तेव्हा ग्राहकाने दिलेली प्रतिक्रिया मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेणारी होती. दिवस असो वा रात्र, आम्ही मदत करायला तुमच्यासाठी नेहमीच हजर असतो. त्यातच पिझ्झा पोहोचवणे हे सुद्धा त्याच वचनाचा एक भाग आहे.
माणुसकीचे दर्शन (Viral Video)
टेम्पे पोलिस विभागाने एक्स (ट्विटर) वर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, ते प्रथम डिलिव्हरी ड्रायव्हरला अटक होत असतानाचा क्षण दाखवतो. नंतर , दोन पोलिस अधिकारी पिझ्झा घेऊन ग्राहकाच्या दाराकडे जाताना दिसतात. सगळ्यात आधी ते दारावरची बेल वाजवतात आणि जेव्हा ती महिला दार उघडते तेव्हा एक अधिकारी तिला नम्रपणे म्हणतो, “तुमचे पार्सल देणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक झाली आहे, म्हणून आज आम्ही तुमचा पिझ्झा पोहोचवतो आहे. जो अजूनही गरम आहे अशी आम्ही अपेक्षा करतो”. यावर महिला “आश्चर्यचकित होऊन खूप खूप धन्यवाद पोलिसांना म्हणताना दिसते”.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @TempePolice या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये घडलेला प्रकार सविस्तर लिहिला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “पोलिसांना पिझ्झा घेऊन तुमच्या दारात पाहून किती आश्चर्य वाटेल”, “पिझ्झा पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी खूपच छान काम केले. बहुतेक वेळा लोक त्यांच्या आयुष्यातील वाईट काळात किंवा वेगाने गाडी चालवल्यामुळे पोलिसांना भेटतात. पण, ही मानवी बाजू खूपच छान आहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.