Viral Video Marathi vs Hindi Debate : राज्यात काही दिवसांपासून मराठीचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरू असताना काही जण मराठी भाषेचा अपमान, तर अनेक जण मान-सन्मान देतानाही दिसत आहेत. त्यामध्ये काही जण महाराष्ट्रात राहूनसुद्धा मराठी नाही बोलायचे, असा हट्ट करून बसतात. पण, या सगळ्यात अनेक जण तोडकं-मोडकं मराठी बोलून अनेकांची मनं जिंकून जातात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तर एका बिहारी जोडप्यानं सगळ्यांना थक्क करून सोडलं आहे.
@mrighnaaaaaaa या इन्स्टाग्राम युजरनं तिच्या आई-बाबांचा गोड क्षण व्हिडीओत रेकॉर्ड करून घेतला आहे. व्हायरल व्हिडीओत दिसणारं कुटुंब बिहारचं आहे. तर, व्हिडीओतील बिहारी जोडपं ‘कराओके’ या म्युझिक प्लेअरच्या मदतीनं ‘मळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी’ हे मराठी गाणं अगदी सुरेल आवाजात गाताना दिसत आहे. सगळ्यात आधी आई आणि मग त्यानंतर बाबा, असे दोघेही मिळून हे मराठी गाणं संपूर्ण गातात आणि सगळ्यांना थक्क करून सोडतात.
एका मराठी माणसाकडून खूप प्रेम (Viral Video)
मराठी बोलता येत नाही म्हणून मारामारी, मराठी बोलायचं नाही म्हणून दादागिरी करणाऱ्यांमध्ये आपण जिथे जाऊ, तिथली भाषा शिकण्याची आवड असणारीही बरीच मंडळी असतात. व्हायरल होणारा हा व्हिडीओ याचं उत्तम उदाहरण आहे. बराच काळ महाराष्ट्रात राहून या बिहारी जोडप्यानं येथील भाषा, गाणी अगदी व्यवस्थित शिकून घेतली आहेत. बिहारी जोडप्यानं गायलेलं ‘मळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी’ हे मराठी गाणं एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mrighnaaaaaaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘इतर राज्यांतील लोक मराठी भाषेचा अपमान करतात. पण, माझे बिहारी पालक महाराष्ट्रात राहून मराठीत गाणे गातात’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी तर व्हिडीओ पाहून प्रेमात पडले आहेत आणि “दोघांचा आवाज खूप सुंदर आहे”, “मराठी भाषेवर प्रेम करणारे मराठीच असतात… महाराजांच्या स्वराज्यात कितीतरी लोक बाहेरून आले होते आणि आज ते इथे मराठी म्हणूनच आहेत”, “मला आता त्यांचा ऑटोग्राफ घ्यावासा वाटतो आहे”, “एका मराठी माणसाकडून खूप प्रेम”, “जे स्वतःला महाराष्ट्रीयन मराठी समजतात, त्यांना काहीच त्रास नाही”, “प्रत्येक भाषेचा आदर केला पाहिजे. कारण- त्यात स्वतःचा एक वेडेपणा असतो” आदी अनेक भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.