Viral Video Sister’s 60th Birthday Surprise : मुलीचे लग्न झाल्यानंतर तिचे माहेर सुटते, असे म्हणण्यापेक्षा तिच्या कुटुंबात नवीन सदस्यांची भर पडते, असे म्हणायला हरकत नाही. सासर-माहेर वेगळे मानायचे नाही, असे सकारात्मक मानसिकतेने वागायचे म्हणून कितीही ठरवले तरीही माहेरच्या माणसांची कमतरता कोणीच पूर्ण करू शकत नाही. त्यांना बघितल्यावर जो आनंद होतो, तो कदाचित ती मुलगी शब्दांतही मांडू शकत नाही. असेच काहीसे दृश्य आज सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत बघायला मिळाले आहे. बहिणीच्या ६० व्या वाढदिवसाला भावांनी तिला जबरदस्त सरप्राईज दिले आहे.

आजींच्या ६० व्या वाढदिवसाची तयारी तिच्या घरच्यांनी (सासरच्यांनी) अगदी धुमधडाक्यात केल्याचे दिसते आहे. केक, डेकोरेशन, फुग्यांनी घराची सजावट करून घर खूप सुंदररीत्या सजवले आहे. पण, या सगळ्यात कुठेतरी आजीला तिच्या माहेरच्या माणसांना पाहण्याची ओढ लागलेली असते. त्यामुळे कुटुंबाने हे लक्षात ठेवून आधीच सरप्राईज प्लॅन केलेला असतो आणि तिन्ही भावांना बोलावून घेतलेले असते. पण, याबद्दल आजीला काहीच कल्पना नसते. नक्की कसे सरप्राईज दिले गेले ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

“असं प्रेम बघायला खूप कमी भेटतं” (Viral Video)

घराची सजावट केल्यानंतर डोळ्यांवर पट्टी बांधून आजीला हॉलमध्ये आणले जाते. त्यानंतर तिचे तिन्ही भाऊ तिच्या शेजारी येऊन उभे राहतात. डोळ्यांवरची पट्टी काढताच आजीचे लक्ष एकदम तिच्या तिन्ही भावांकडे जाते. तिन्ही भावांना तेथे एकत्र आल्याचे पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. प्रत्येकाला जाऊन ती मिठी मारते आणि तिचा आनंद व्यक्त करते. बहिणीने आपल्याकडे बघून व्यक्त केलेली प्रतिक्रिया पाहून, त्या तिन्ही भावांच्याही चेहऱ्यावर आनंदाने हसू उमटते. भाऊ-बहिणीचे प्रेम कसे असते ते व्हिडीओतून नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @nikhiilwagh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘बहिणीच्या ६० व्या वाढदिवसाला सगळे भाऊ एकत्र आले’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “आईचा आनंद बघून डोळ्यांत पाणी आलं”, “हीच खरी संपत्ती आहे”, “असं प्रेम बघायला खूप कमी भेटतं”, “वाह! असेच प्रेम राहू दे.. सगळ्यात मौल्यवान भेट चेहऱ्यावरचे हास्य”, “एका बहिणीसाठी यापेक्षा बेस्ट गिफ्ट काय असू शकतं”, “बरोबर कोणी असेल ना असेल; पण भाऊ पाठीशी असला की, अख्खं माहेर पाठीशी असल्यासारखं वाटतं”, “रडवलं ना राव तुम्ही” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.