आंध्र प्रदेशच्या कर्नूल येथे झालेल्या भीषण बस अपघातातील एक दुचाकीने बसला धडक दिली होती. शुक्रवारी पहाटे झालेल्या या दुर्घटनेत दुचाकीस्वारासह २० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान हा भीषण अपघात घडण्याच्या काही क्षण आधीचे एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्याचा अपघात झाला तो हाच दुचाकीस्वार असल्याचे सांगितले जात आहे, दरम्यान अद्याप या व्हिडीओची पुष्टी न झालेली नाही.

अपघातात मरण पावलेला दुचाकीस्वार हा शिवशंकर असल्याची पुष्टी झाली आहे. दरम्यान पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दारूच्या नशेत असल्याप्रमाणे दिसत होता, असे फुटेज सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे.

पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये २४ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजून २२ मिनिटांची वेळ दिसून येत आहे. ज्यामध्ये दुचाकीवर दोन व्यक्ती येताना दिसता. त्यापैकी एक जण नंतर दुचाकी चालवत बाहेर पडताना दिसतो. यावेळी त्याचे थोड्या काळासाठी संतुलन बिघडल्याचेही पाहायला मिळतो, पण तो लगेचच तो सावरतो.

पोलिसांनी अद्याप या सीसीटीव्ही फुटेजची पुष्टी केलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस दुर्घटना शुक्रवारी पहाटे २:३० ते ३:०० च्या सुमारास घडली, त्यामुळे फुटेजमधील टाइम स्टॅम्प या घटनाक्रमाशी जुळणारे दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यादरम्यान डेक्कन क्रॉनिकल रिपोर्टमध्ये देखील प्राथमिक माहितीनुसार शिवशंकर हा त्या वेळी दारूच्या नशेत होता, असे म्हटले आहे. शुक्रवारी कर्नूल शहराजवळ झालेल्या भीषण बस अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये त्याचाही समावेश होता.

पीटीआय वृत्तसंस्थेने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने शनिवारी वृत्त दिले की , २० लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुर्घटनेच्या प्रकरणात खासगी बसच्या दोन चालकांवर निष्काळजीपणा आणि वेगाने वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात बचावलेल्या एन रमेश यांच्या तक्रारीनंतर कूर्नूल जिल्ह्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी पहाटे बंगळूरूकडे निघालेल्या खासगी बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर बसला आग लागली. ही धडक बसली तेव्हा दुचाकीच्या इंधन टाकीचे झाकण उघडे असल्याचे सांगितले जात आहे.