Delhi Couple Denied Entry To Restaurant Because Woman In Saree Watch Video : पोशाख हा व्यक्तिमत्त्वाचा भाग असतो. आपण परिधान करत असलेल्या प्रत्येक पेहेरावाचे स्वतःचे असे विशिष्ट्य महत्त्व असते. कपड्यांचे रंग व प्रकार यात भरपूर प्रमाणांत विविधता आढळते. काही वेळा आपण पारंपरिक, मॉडर्न, वेस्टर्न असे आवडी-निवडीनुसार कपडे परिधान करतो. ड्रेसकोडसंदर्भातील नियम शाळा, धार्मिक ठिकाणी आपल्यासाठी लागू केलेले असतात. पण, जर एखादं रेस्टॉरंट तुम्ही परिधान केलेले कपडे पाहून प्रवेश देत नसेल तर…. आज अशीच एक घटना एका जोडप्याबरोबर घडली आहे; ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दिल्लीतील पीतमपुरा मेट्रो स्टेशनच्या खाली असलेल्या कॅम्पसमध्ये एक तुबाटा नावाचे रेस्टॉरंट आहे. ३ ऑगस्ट २०२५ रोजी एक जोडपे तिथे गेले होते. दोघांचाही ड्रेस अगदी पारंपरिक होता. महिलेने ड्रेस आणि पुरुषाने शर्ट-पँट असा पोशाख परिधान केला होता. पण, तरीही जोडप्याला रेस्टॉरंटबाहेर थांबवले गेले आणि अगदी छोटे, पूर्ण अंग न झाकलेले कपडे घालून येणाऱ्या अनेक ग्राहकांना सहजपणे आतमध्ये जाऊ देण्यात आले. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांच्या अशा या धक्कादायक वर्तुणुकीमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

फक्त आमचीच नाही तर भारतीय संस्कृतीची इज्जत काढली (Viral Video)

रेस्टॉरंटमध्ये कपड्यांवरून प्रवेश द्यायला नकार दिल्यावर जोडप्याने त्यासंबंधीचा एक व्हिडीओ बनवला आणि कर्मचाऱ्यांना विचारले, “दिल्लीच्या मुख्यमंत्री, ज्या स्वतः साडी नेसतात त्यांनासुद्धा तुम्ही प्रवेश देणार नाही का? तुम्ही फक्त आमचाच नाही, तर भारतीय संस्कृतीचा अपमान केला आहे (बेइज्जती की है)”, असे महिला या व्हिडीओत म्हणताना दिसते आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rose_k01 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘दिल्लीतील पीतमपुरा येथील तुबाटा रेस्टॉरंटमध्ये काय चाललं आहे ते पाहा. भारतीय पोशाख घातला म्हणून एका जोडप्याला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश दिला नाही’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी रेस्टॉरंटवर भारतीय संस्कृतीचा अनादर केल्याबद्दल टीका केली; तर काही जणांनी पारंपरिक पोशाखांना परवानगी नसताना पाश्चात्त्य पोशाखांना परवानगी का आहे, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच काही जणांनी रेस्टॉरंटचे समर्थन करीत “ही खासगी रेस्टॉरंट्स आहेत आणि कोण यावे किंवा नाही हे ठरवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.