Viral Video RPSC Senior Teacher Recruitment Exam : परीक्षा केंद्रात वेळेवर जाणे गरजेचे असते. पेपर आहे म्हंटल्यावर आणि त्यात जर परीक्षा केंद्र दूर असेल तर काही तास घरातून निघणे बेस्ट ठरते. पण, काही जण वेळेची पर्वा करत नाहीत तर अनेक जण ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे उशिरा पोहचतात. यासाठी अनेक जण विनवणी करतात, रडतात तर काही जण ओळखीच्या लोकांकडे धाव घेतात. पण, नियम हे सगळ्यांसाठी सारखेच असतात; हे अनेक जण विसरूनच जातात.

पण, राजस्थानातील बारन जिल्ह्यातील शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी दाखवून दिले की, नियम सर्वांना लागू होतात, अगदी त्यांच्या कुटुंबालाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिक्षण मंत्री मदन दिलावर पुतणी, सीमा परिहार, आरपीएससी वरिष्ठ शिक्षक भरतीच्या पेपरसाठी रिपोर्टिंग वेळेनंतर अत्रू येथील कमला कॉन्व्हेंट स्कूल परीक्षा केंद्रावर पोहोचली. तिने जवळजवळ अर्धा तास कर्मचाऱ्यांना हात जोडून, आत जाऊ देण्याची विनंती केली.

जेव्हा तिने केलेली विनंती अयशस्वी झाली, तेव्हा सीमाने तिचे काका, शिक्षणमंत्री मदन दिलावर यांना फोन करून परीक्षा अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले. पण, शिक्षणमंत्री यांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि त्यांना सांगितले की, “नियम सर्वांसाठी सारखे आहेत; परीक्षेला बसणारा प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी समान आहे. उशिरा पोहोचल्याबद्दल कोणतीही सवलत दिली जाऊ शकत नाही” असे एनबीटीच्या अहवालात सांगण्यात आले आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

भारतीय राजकारणातील एक दुर्मिळ उदाहरण (Viral Video)

तिच्याबरोबर गेटवर आलेल्या तिच्या पालकांनीही कर्मचाऱ्यांना आवाहन केले. पण, अधिकाऱ्यांनी आरपीएससीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आणि प्रवेश नाकारला. सीमाला परीक्षा न देताच निघून जावे लागले. या घटनेमुळे अनेकांनी कौटुंबिक संबंधांमध्ये निष्पक्षता राखल्याबद्दल कौतुक केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ReporterSahab या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “मंत्री मदन दिलावर यांनी त्यांच्या स्वतःच्या पुतणीला परीक्षेला उशिरा आली तरीही नियमांचे पालन केले हे पाहून खरोखर कौतुक वाटले. हस्तक्षेप न करण्याचा त्यांचा निर्णय शिक्षण व्यवस्थेतची प्रशंसनीय वचनबद्धता दर्शवितो” , “असे काका फार कमी असतात! शिक्षणमंत्र्यांची पुतणी परीक्षेला उशिरा पोहोचली आणि त्यांनी फक्त म्हटले, आता घरी जा”, “भारतीय राजकारणातील एक दुर्मिळ उदाहरण,” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.