Retired IPS Officer Viral Video : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती व महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा त्यांच्या प्रेरणादायी आणि व्हायरल ट्वीटसाठी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. विविध क्षेत्रांतील अनेक गोष्टींची माहिती ते ट्वीटच्या माध्यमातून देताना दिसतात. तसेच एखाद्या युजरची पोस्ट त्यांना मजेशीर किंवा कौतुकास्पद वाटली की, ते त्या माहितीवर स्वतःचे मत मांडून, ती सोशल मीडियावरही अगदी आवर्जून शेअर करतात. तर, आज आनंद महिंद्रा यांनी निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हायरल व्हिडीओत दिसणारी व्यक्ती चंदिगडच्या इंदरजीत सिंग सिद्धू (Inderjit Singh Sidhu)आहेत. इंदरजीत सिंग सिद्धू १९६४ चे आयपीएस अधिकारी आहेत. दररोज सकाळी ६ वाजता चंदिगडच्या सेक्टर ४९ च्या शांत रस्त्यावरून निवृत्त आयपीएस अधिकारी त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. स्वच्छता व सुरक्षा यासंबंधीच्या यादीत चंदिगडला सगळ्यात कमी दर्जा मिळाला. त्यामुळे तक्रार करण्याऐवजी आयपीएस अधिकारी यांनी कृती करून दाखवण्याचे ठरवले. तसेच रस्त्याच्या कडेला कचरा उचलत, हातगाडीवर ठेवून ते स्वतःचे कर्तव्य पूर्ण करताना दिसत आहेत.
वयाचे बंधन नाही किंवा प्रसिद्धीची अपेक्षा नाही… (Viral Video)
निवृत्त आयपीएस अधिकारी इंदरजीत सिंग सिद्धू आपल्या सेक्टर ४९ परिसरातील कचरा उचलून हातगाडीवर लादताना दिसत आहेत. इंदरजीत सिंग सिद्धू फक्त कचराच उचलत नाहीत, तर ते सगळ्यांना संदेश देत आहेत की, आपले जग अधिक चांगले आणि स्वच्छ असू शकते. इंदरजीत सिंग सिद्धू यांना वयाचे बंधन नाही किंवा त्यांना प्रसिद्धीची अपेक्षासुद्धा नाही. पण, तरीही चंदिगड स्वच्छ करण्यासाठी ते जमेल तसे प्रयत्न करीत आहेत. तरी हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा भारावून गेले आहेत.
व्हिडीओ बघा…
आनंद महिंद्रा यांनी अधिकृत अकाउंटवरून @anandmahindra या व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला ‘माणूस निवृत्त होतो; पण त्याचं आयुष्यातील ध्येय किंवा उद्दिष्ट संपत नाही’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. कमेंटमध्ये नेटकरीसुद्धा या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याचे कौतुक करीत आहेत. एक युजरने, “अविश्वसनीय काम. स्थानिक नगरपालिका आपण सर्व जण जे शहर स्वच्छ ठेवण्यात अयशस्वी ठरलो, त्यांच्या तोंडावर हा व्हिडीओ चपराक मारतो आहे”, अशी कमेंट केली आहे.