Heartwarming Indian Train Video: अस्सल श्रीमंती म्हणजे नेमकी काय? करोडो रुपयांच्या गाड्या, महालातलं आयुष्य, चमकदार कपडे व ऐटदार जीवनशैलीच खरी श्रीमंती आहे का? की कुटुंबासोबतचे साधे-सोपे क्षण, आपल्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर उमटलेली स्मितरेषा आणि निस्सीम प्रेम हाच खरा खजिना आहे? हे प्रश्न वाचून कदाचित तुम्ही विचारात पडाल. पण, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका साध्या व्हिडीओने मात्र या प्रश्नाचे असेच उत्तर दिलेय, की लोक अक्षरशः भावूक झालेत.

आजच्या जगात बहुतांश लोकांना श्रीमंती म्हटल्यावर डोळ्यांसमोर येतात ते महाल, करोडोंच्या गाड्या, बँक बॅलन्स आणि ऐषारामाची साधने. पण, खरी श्रीमंती म्हणजे हेच का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो आणि याच प्रश्नाचं उत्तर देणारा एक साधा; पण हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचेही मन नकळत म्हणेल – “हो खरंच, असली दौलत म्हणजे आपलं कुटुंबच!”

दृश्य आहे भारतीय रेल्वेच्या एका सामान्य डब्याचं. तिथे एक बाप, आई आणि त्यांची लहानशी लेक आरामात बसल्याचे दिसतात. महाल नाही, ऐश्वर्य नाही, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर अशी चमक आहे की, लाखोंची रोषणाईही त्यासमोर फिकी पडेल.

भारतीय रेल्वेच्या एका गाडीतल्या साध्या डब्यात, डोक्यावर साधा छोटा टॉवेलवजा कपडा बांधलेला बाप आपल्या चिमुकल्या लेकीचे विस्कटलेले केस हळुवारपणे आवरून, बांधताना दिसतोय. त्याच्या मांडीवर बसलेली मुलगी आणि बाजूलाच विसावलेली आई या दृश्यात सोन्याचा चमकदार दागिना नाही, ना ऐटदार लाइफस्टाईल; पण तेथे आढळतो तो प्रेम, आपलेपणा व समाधान यांचा मिलाफ साधणारा अमूल्य खजिना! हे पाहून नेटकऱ्यांनी एकच म्हटलं– “खरी अमिरी बँकेतल्या आकड्यांत नाही, तर या नात्यांमध्ये दडलेली आहे.”

व्हिडीओमध्ये दिसते की, बापाने डोक्याला छोटासा टॉवेलवजा कपडा बांधलेला आहे आणि तो आपल्या लेकीचे केस अगदी मायेने बांधताना दिसतोय. आणि आई त्यांच्या शेजारी निवांत विसावलेली आहे. या छोट्याशा क्षणात जेवढी आपुलकी, प्रेम व समाधान दिसतं, ते महागड्या बंगल्यांतही सापडणार नाही. या व्हिडीओतला बाप जगातील सर्वांत श्रीमंत माणूस वाटतो. कारण- त्याच्याकडे आहे त्याचं कुटुंब, त्यांचा आधार व निखळ प्रेम.

लोकांनी कमेंट्समध्ये लिहिलंय

“हीच खरी श्रीमंती आहे, जी कोट्यवधी पैशांनी विकत घेता येत नाही.” “या व्हिडीओनं आठवण करून दिली की, खरे आनंदाचे क्षण फक्त आपल्या लोकांसोबतच असतात.”; पण हे प्रेम आणि नात्यांचं बंधन हीच खरी संपत्ती आहे.” इन्स्टाग्रामवर speedy__world नावाच्या अकाउंटवरून शेअर केला गेलेला हा व्हिडीओ काही तासांतच हजारोंच्या हृदयाला भिडला. खरं तर ही फक्त एक साधी रेल्वे यात्रा नाही… तर कुटुंबाच्या रूपात दिसणारी देवाची खरी देणगी आहे.

येथे पाहा व्हिडीओ

एकदा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात की, तुमच्याही मनात प्रश्न येईल,
“खरंच, आपण श्रीमंत आहोत का? की अजूनही फक्त दौलतीच्या मृगजळामागं धावतोय?”