लहान मुलांना शाळेत जाताना डब्यात काय द्यायचे असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. कारण लहान मुलं चपाती-भाजी खाण्यास कंटाळा करतात. त्यांना नेहमीच चिप्स, सँडविच असे चमचमीत पदार्थ खायला आवडतात. पण, आज सोशल मीडियावर एक वेगळंच दृश्य पहायला मिळालं आहे. यात एक चिमुकला आईबरोबर बसून आठवडाभराचा मेन्यू ठरवताना दिसला आहे; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढं नक्की.
एक कुटुंब त्यांच्या खोलीत बसून चिमुकल्याला शाळेत डब्यासाठी काय द्यायचे, यासाठी आठवड्याचे वेळापत्रक ठरवत आहेत. आई तिच्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला तुला दररोज डब्यात काय खायला हवे असे विचारत आहे. तसेच चिमुकलाही आईसमोर अगदीच विचारपूर्वक उत्तर देताना दिसतो आहे. त्याचवेळी त्याचे बाबादेखील तिथे उपस्थित असतात. तर चिमुकल्याने त्याचा आठवड्याचा मेन्यू आई-बाबांबरोबर बसून कसा ठरवला एकदा तुम्हीसुद्धा या व्हायरल व्हिडीओतून बघा.
हेही वाचा…जगातील सर्वात उंच व्यक्ती अन् सर्वात बुटक्या व्यक्तीची झाली भेट, Video पाहून युजर्स थक्क; म्हणाले…
व्हिडीओ नक्की बघा :
शाळेत डबा घेऊन जाण्यासाठी ठरवतायत वेळापत्रक :
व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल, सोमवारी डब्यात पोळी आणि भाजी, मंगळवारी भेंडीची भाजी, पोळी आणि मखाना, बुधवारी सँडविच, गुरुवारी पुरी आणि बटाट्याची भाजी, शुक्रवारी भात, फळांमध्ये द्राक्ष; असे वेळापत्रक आई-बाबा आणि चिमुकल्याने ठरवले आहे. तसेच हेच वेळापत्रक आता फॉलो करण्यात येईल, असे आई चिमुकल्याला सांगताना दिसते आहे.
पाच वर्षांच्या चिमुकल्याचे नाव चिकू यादव आहे. तसेच त्याने स्वतःच्या @cheekuthenoidakid या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे, जे त्याचे बाबा हॅन्डल करतात. चिमुकल्याचे असे अनेक मजेशीर व्हिडीओ इथे पोस्ट केले आहेत. तसेच नेटकरी हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट करताना दिसून आले आहेत. चिमुकल्याचा निरागसपणा, त्याचे हावभाव आणि त्याची बोलण्याची पद्धत अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसते आहे, असे कमेंटमध्ये दिसून आले आहे.