Viral Video Driving Passion Turned Profession : परिस्थिती अनेकदा स्वप्नांच्या मध्ये येते, असे अनेक जणांना तुम्ही बोलताना पाहिले असेल. पण, जो स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट घेण्यासाठी मनाची तयारी करतो त्याच्यासमोर परिस्थिती कधीच आडवी येत नाही. आज अशाच एका तरुणीची गोष्ट व्हायरल व्हिडीओतून आपल्यासमोर आली आहे, जिच्या गाडी चालवण्याच्या (ड्रायव्हिंग) आवडीचे तिने व्यवसायात रूपांतर केले आहे.
प्रवासी तमन्ना तनवीर बंगळुरूमध्ये उबर, ओला, रॅपिडो बुक करण्याचा प्रयत्न करत होती. त्यादरम्यान तिची भेट सफुराशी झाली; जी एक महिला रिक्षाचालक होती. त्यादरम्यान दोघींचा संवाद सुरू होतो आणि प्रवासी तमन्ना तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात करते. त्यादरम्यान तमन्नाला समजले की, सफुराला गाडी चालवायला खूप आवडते. कार, ऑटो, बाईक अगदी कोणतेही वाहन ती चालवू शकते. तिला स्विफ्ट कार खरेदी करायची होती. पण, तिचे बजेट फक्त रिक्षा घेण्यापुरतेच मर्यादित होते. म्हणून तिने लहान वाहनापासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आणि एक रिक्षा खरेदी केली.
प्रत्येक दिवसाचा आनंद घेत ती रिक्षा चालवते (Viral Video)
२९ वर्षीय सफुरा हिने HT.com ला सांगितले की, तिने भावाकडून मोटरसायकल, तर मैत्रिणीकडून गाडी कशी चालवायची ते शिकून घेतले. बंगळुरूमधील या तरुणीने सुरुवातीला स्विगीसारख्या ब्रँडमध्ये डिलिव्हरी क्षेत्रातसुद्धा काम केले आहे. त्यानंतर भाड्याने घेतलेले वाहन चालवण्यासाठी ती उबरमध्ये गेली; पण तिच्यासाठी ही गोष्ट खूप खर्चीक ठरली. त्यांनी गाडी भाड्याने देण्यासाठी दररोज १,००० आणि सीएनजीसाठी १,००० आकारले. म्हणून तिने ती नोकरी सोडली आणि आईकडे गाडी मागितली. तिच्या आईने कार खरेदी करण्यासाठी बजेट नाही; पण तिला रिक्षा घेण्यास मदत केली.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @tamannapasha_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. २९ वर्षीय ही तरुणी सकाळी ५ वाजता उठून रिक्षा चालवायला जाते आणि दिवसातून १४ तास काम करते. तिला आठवड्याच्या पहिल्या दिवशी, ‘अरे, परत सोमवार आला’ ही गोष्ट बोलावी लागत नाही. कारण- प्रत्येक दिवसाचा आनंद घेत ती रिक्षा चालवते’, असे तिने आवर्जून सांगितले. त्यानंतर प्रवासी तमन्नाने महिलांना प्रेरणा दिल्याबद्दल तिचे कौतुक केले आणि इथेच व्हिडीओचा शेवट झाला.