Viral Video Groom Batmobile Wedding Entry : आपल्या येथे लग्न म्हणजे एक मोठी पर्वणीच असते. धमाल, मज्जा-मस्ती, डान्स आणि आपलं लग्न वेगळ्या पद्धतीनं होऊन, ते चर्चेत राहावं यासाठी अनेक जण आगळेवेगळे प्रयत्न करीत राहतात. त्यामध्ये लग्नातील मंडपात नवरा-नवरीची एंट्री लक्षवेधी ठरते. कोणी पालखीतून, कोणी घोड्यावरून, तर कोणी बैलगाडी मंडपात धमाकेदार एंट्री करीत असतात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये नवऱ्या मुलाने एंट्री घेतल्यावर सगळे फक्त आणि फक्त गाडीकडे बघत राहिले आहेत.
बॅटमॅनची खास गाडी ‘बॅटमोबाईल’बद्दल तुमच्यातील अनेकांना माहीत असेल. बॅटमोबाईल ही डीसी कॉमिक्सच्या सुपरहीरो बॅटमॅनने चालवलेली आयकॉनिक हाय-टेक कार आहे. या गाडीला गॅझेट्स, शस्त्रे व मजबूत कवच असते. ही गाडी बॅटमॅनला गुन्हेगारांशी लढायला मुख्य साधने आणि यंत्र अशा दोन्ही प्रकारे मदत करते. त्यातच नवरदेवाने घोडा आणि विंटेज कार सोडून बॅटमोबाईलवरून जबरदस्त एंट्री केल्याचे पाहून लग्नातील पाहुणे आणि बॅटमॅनच्या चाहत्यांना धक्का बसला असेल, एवढे तर नक्कीच.
कोणीतरी नवऱ्याकडेही बघा… (Viral Video)
फ्रेंड्स स्टुडिओने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हा नवरदेव सदरा, कुर्ता-फेटा घालून आयकॉनिक सुपरहीरोच्या बॅटमोबाईलमध्ये बसून लग्नमंडपात पोहोचला आहे. या खास एंट्रीला मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य ढोल, नगारा यांच्या तालावर नाचून साथ देताना दिसत आहेत. पण, तुम्ही जर व्यवस्थित पाहिले, तर या गाडीला नेहमीप्रमाणे सजावट किंवा बदामात नवरा-नवरीचे नावाद्वारे अजिबात सुशोभित करण्यात आलेलं नाही. तुम्हीसुद्धा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील ही अनोखी वरात एकदा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @friendsstudio.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. “सगळ्यांचे लक्ष फक्त गाडीवर आहे; कोणीतरी नवऱ्याकडेपण बघा”, “ही गाडी किमान १०० कोटी मुलांचे स्वप्न आहे”, “नवरा मुलगा अस्वस्थ दिसत आहे”, “बॅटमोबाईलवर फुलांची सजावट करण्यात आलेली नाही”, “हा व्हिडीओ पाहून बॅटमॅन म्हणेल की, माझ्या शक्तींचा चुकीचा उपयोग केला जात आहे” आदी मजेशीर कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.