Group Of Friends Stuck In Lift : बऱ्याच लोकांना लिफ्टची प्रचंड भीती वाटते. लिफ्ट थांबवताना चुकून हात अडकला, लिफ्ट मधेच बंद पडली तर काय होईल, असे प्रश्न मनात येऊ लागतात. अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मुलांचा एक ग्रुप लिफ्टमध्ये अडकल्याचे दिसले. काही लोक लिफ्टमध्ये अडकल्यावर पॅनिक होतात, आरडाओरडा करतात, लिफ्टमधील सगळी बटणं दाबू लागतात. पण, स्वतःला लिफ्टमधून बाहेर काढण्यासाठी या ग्रुपने जबरदस्त डोकं लावलं आहे.

एका हॉटेलच्या टेरेसवरून काही मुलं खाली येत असतात; पण लिफ्ट अचानक बंद पडली आणि इथूनच त्यांची परीक्षा सुरू झाली. त्यानंतर मग काही जण घाबरले, तर कधी गोंधळात पडले आणि अखेर एका जबरदस्त जुगाडाने लिफ्टच्या बाहेर पडले. लिफ्टमध्ये अडकलेल्या ग्रुपने ताबडतोब रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना मदतीसाठी फोन केला. पण, त्वरित मदत मिळण्याऐवजी त्यांनी फोनवर “मी घरी आहे”, असे सांगितले. त्यानंतर फोन न ठेवता, त्यांनी लिफ्टमधून बाहेर पडण्यासाठी दरवाजे मॅन्युअली कसे उघडायचे ते समजावून सांगितले.

मॅन्युअली लिफ्ट उघडण्यास पाडले भाग (Viral Video)

काही क्षणांनंतर व्हिडीओतील ग्रुपने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागले. लिफ्टच्या दरवाजाजवळ खूप वायर्स होत्या आणि एक मॅन्युअल की किंवा लॉक (Key Or Lock) त्यांनी फिरवला आणि त्यानंतर ग्रुपमधील एका मुलाने दरवाजा दोन्ही हातांनी खोलण्याचा प्रयत्न केला. एकाने दरवाजा पकडला आणि सगळे एकेक करून बाहेर पडण्यासाठी उड्या मारताना दिसले आणि मग लिफ्टचा दरवाजा बंद झाला. ही सर्व घटना एका थ्रिलर चित्रपटासारखी आहे. कारण- यातील एकेक क्षण पाहून तुम्हाला भीती आणि अंगावर शहारेसुद्धा येतील.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @haider.styling या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘स्टोरी टाईम’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत आणि या घटनेची ‘फायनल डेस्टिनेशन’ या हिट थ्रिलर चित्रपटाशी तुलना करताना दिसले. तर अनेक जण “म्हणूनच मी एकटा असताना लिफ्ट वापरत नाही”, “जाळी असणारी लिफ्ट सर्वांत चांगली आहे. त्यात तुम्ही अडकलात, तर कोणीतरी तुम्हाला बाहेरून पाहू तरी शकते” आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत..