Haryana Man And Maharashtra Worker Viral Video : महाराष्ट्रात सध्या मराठी विरुद्ध हिंदी, असा वाद सुरू आहे. यादरम्यान कोणी “मराठीतच बोल”, असं हक्कानं सांगताना दिसत आहे; तर कोणी, “आम्ही हिंदीमध्येच बोलणार काय करशील सांग”, अशी दादागिरी करताना दिसत आहे. बघायला गेलं, तर आपण परदेशात जाऊन इंग्रजीमध्ये बोलतो, कोणाला मराठी येत नसेल, तर आपण त्याला हिंदीमध्ये सांगतो. मग महाराष्ट्रात राहताना मराठी यायला हवं हा आग्रह चुकीचा का ठरतोय, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहे. पण, यामध्ये मध्यस्थी काढून हा वाद मिटायलासुद्धा हवा यासाठीही कुठेतरी आपल्या सगळ्यांनाच वाटते आहे. जर तुम्हालाही असे वाटत असेल, तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्हाला आवडेल.
व्हायरल व्हिडीओ हरियाणातील आहे. मनू शर्मा एक हरियाणवी माणूस आहे आणि तो महाराष्ट्रातील नाशिक येथील एका तरुणाशी संवाद साधताना दिसतो आहे; जो एका शेतात काम करतो. व्हिडीओच्या सुरुवातीला मनू शर्मा “येथे महाराष्ट्राचा कोण आहे?” असे विचारतो. तेव्हा एक कामगार त्याच्याकडे येतो आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो. पण, मनू शर्मा “हरियाणवीत बोला!” असे म्हणतो. तेव्हा महाराष्ट्रीयन तरुण थोडा घाबरून हरियाणवी भाषा येत नसल्याचे कबूल करतो. पण, हे ऐकून मनू शर्मा अगदी प्रेमाने “हा तुमचा देश आहे. जर तुम्ही इथे काम करणार नाही, तर कोण करणार? हे तुमचे राष्ट्र आहे – तुम्हाला जे हवे ते करा” , असे अगदी आपुलकीने म्हणतो.
अनेक दिवसांपासून आपण पाहिले असेल की, मराठी न बोलणाऱ्या लोकांना त्रास दिला जात असल्याचे अनेक व्हिडीओंतून पाहायला मिळाले आहे. पण, या व्हिडीओत एकमेकांचा आदर केल्याबद्दल या व्हिडीओचे प्रचंड कौतुक होते आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @notthatmanusharma या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
एक मराठी म्हणून मी माफी मागतो (Viral Video)
हा व्हिडीओ पाहून एका युजरकडून केली गेलेली कमेंट लक्षवेधी ठरते आहे. “एक मराठी म्हणून मी माफी मागतो. माझ्या ऑफिसमध्येही आयटी कंपन्यांमध्ये सर्व मॅनेजर शर्मा, मिश्रा, शुक्ला असतात. त्यांच्यासमोर हेच लोक हिंदी बोलतात. पण जेव्हा त्यांना कोणी गरीब भेटतो; जसे की पाणीपुरी विक्रेता किंवा झोमॅटो डिलिव्हरी करणारा माणूस तेव्हा ते गुंडांसारखे वागतात. मी वैयक्तिकरीत्या महाराष्ट्रापासून ते संपूर्ण देशाची माफी मागतो”, असे मत त्याने मांडले आहे. तर दुसरा म्हणतोय, “आपल्या देशातील अनेक राज्यांना अशा पद्धतीनं शिकवायला पाहिजे. छान! प्रत्येक मराठी माणसानं हे शिकलं पाहिजे”, अशी कमेंट केली आहे.